नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी केलेल्या नळपाणी पुरवठा योजना बिनकामाच्या ठरल्या असून, या योजनांना पाणीच नसल्याने त्यावर करण्यात आलेला कोट्यवधी रूपयांचा खर्च पाण्यात गेल्याची भावना व्यक्त करत, जिल्ह्यातील पाण्याअभावी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची चौकशी करून संबंधितांकडून रक्कम वसुलीचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत भास्कर गावीत यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पेठ तालुक्यातील काही योजना बंद पडल्या असून, नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकावे लागत आहे. या योजना काहीच कामाच्या ठरल्या नसून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळेही या योजना कुचकामी ठरल्याची तक्रार गावीत यांनी केली. त्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे यांनी संबंधित योजना ह्या जुन्या झाल्या असून, त्यावेळी तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशींनी या योजना पूर्णत्वास नेण्यात आल्या, त्यांनीच या योजनांच्या निविदा काढल्या व मंजूरही केल्या. त्यावेळी राज्य सरकारकडे या योजना होत्या व त्यातील त्रुटी लक्षात आणून दिल्यामुळेच आता त्यावर जिल्हा परिषदेचे नियंत्रण आणल्याचे स्पष्टीकरण दिले. अशा योजना पुनरुज्जीवित करताना जलजीवन मिशन योजनांच्या माध्यमातून बळकट करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यावर सभापती संजय बनकर यांनी अशा योजनांची चौकशी करण्याची मागणी केली. महेंद्रकुमार काले यांनी मांगीतुंगी येथील योजनेवर ३५ ते ४० कोटी रूपये खर्च करूनही योजना कुचकामी ठरल्याची तक्रार केली. त्यावर अशा सर्व योजनांची चौकशी करून ठेकेदारांची देयके अदा करू नयेत तसेच त्यांची अनामतही रोखण्यात यावी, अशी मागणी बनकर यांनी केली. त्यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी योजनांची चौकशी करून देयके, अनामत रोखण्यात यावी व योजनांवर झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात यावा, असे आदेश दिले.
चौकट====
ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा सुरू करा
ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यात आलेल्या पथदीपांचे देयक भरले नाही म्हणून वीज कंपनीने ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित केल्याने अंधाराचे साम्राज्य पसरल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामपंचायतींच्या पथदीपांचे वीजबिलाच्या रकमेसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते, ते अद्याप आलेले नाही. शासनाकडून निधी आल्यास तत्काळ तो अदा केला जाईल, असे सांगितले. त्यावर अध्यक्ष क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश वीज कंपनीला दिले.