नाशिक : घरकुलासाठी शासकीय विभागांमध्ये अनेक योजना असल्या तरी दिव्यांगांपर्यंत घरकुलाचा लाभ पोहचवावा यासाठी दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजनाच असावी अशी आपली भूमिका असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील झाली आहे. दिव्यांगांना अतिरिक्त अन्नधान्याचा लाभ मिळावा यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे आमदार बच्चू कडू यांनी केले.
नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी नाशिक कार्यक्रमात ते बोलत होते. दिव्यांगांसाठीच्या योजना आणि कायदे भरपूर आहेत परंतु प्रशासनाकडून योजना चांगल्या राबविल्या तर त्या दिव्यांगांपर्यंत पोहचतील. प्रशासनातील अधिकारी यांनी आठवड्यातील एक दिवस दिव्यांगांसाठी दिला तर निश्चितच दिव्यांगांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनांची जनजागृती होईल. अंत्योदय योजनेतून निश्चित केलेल्या लक्षांका व्यतिरिक्त उर्वरित ५ टक्के धान्यसाठा दिव्यांगांना प्राप्त होण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचेही कडू म्हणाले.