नाशिक : शहर आणि परिसरातील प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याच्या निगडित असलेल्या ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या आधुनिकीकरण आराखड्याच्या कामासाठी पर्यटन विभागाचे पथक तीन दिवसांच्या नाशिक दौºयावर आले आहे. केंद्र शासनाच्या रामायण सर्किट योजनेंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास होणार असून, त्या अंतर्गत दाखल या पथकाने खासदार हेमंत गोडसे यांच्यासह जिल्ह्यातील पंधरा धार्मिक स्थळांची पाहणी केली. धार्मिक स्थळांची कागदपत्रे, ऐतिहासिक दाखले तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सदर ठिकाणी कोणत्या सोयी-सुविधा देता येईल, याची चाचपणी पथकातील अधिकारी दौºयादरम्यान करणार आहेत. देशात नाशिक शहराची ओळख धार्मिक क्षेत्र म्हणून आहे. परंतु त्या तुलनेत भाविक आणि पर्यटक नाशकात येत नाहीत. याची दखल घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारच्या रामायण सर्किट योजनेत नाशिकचा समावेश करण्यासाठी गोडसे यांनी प्रस्ताव सादर केला होता. तीन महिन्यांपूर्वी केंद्राच्या पर्यटन विभागाने रामायण सर्किट योजनेसाठी नाशिकची निवड केलेली आहे. रामायण सर्किटचा आराखडा तयार करण्याकामी पर्यटन विभागाचे पथक बुधवारी (दि.२४) तीन दिवसांसाठी शहरात दाखल झाले आहे. या पथकाचे प्रमुख रवि सोनकुसारे असून, पथकाने खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत शहरातील प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याच्या निगडित असलेल्या स्थळांची पाहणी केली. या धार्मिक स्थळांमध्ये काळाराम मंदिर, सीतागुंफा, सीताहरण व लक्ष्मणरेषा मंदिर, रामकुंड, तपोवन, दंडकारण्य, रामसृष्टी, रामगयातीर्थ, सीतासरोवर, रामशेज किल्ला, अंजनेरी, सर्वतीर्थ टाकेद, किष्किंदानगरी शुक्लतीर्थ, कावनई कपिलधारा, शूर्पणखातीर्थ या मंदिरांचा समावेश आहे. काळाराम मंदिराचे ट्रस्टी धनंजय पुजारी, सीतागुंफा ट्रस्टचे महंत कवेन्द्रपुरी महाराज, दत्ता बेलदार, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, दिनेश वैद्य, कृष्णकुमार नेरकर, देवांग जानी या मान्यवरांनी पथकाला रामकुंडाच्या स्वच्छतेविषयी महत्त्वाच्या सूचना केल्या.
रामायण सर्किटच्या पाहणीसाठी नाशकात पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:13 AM