नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांची राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी पाहणी केली़ क्षत्रिय यांनी कुशावर्त परिसरात करण्यात आलेल्या अंडरग्राऊंड केबलिंगची माहिती घेतली. ते म्हणाले की, रात्रीच्या वेळी संपूर्ण शहरात चांगला प्रकाश राहील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. प्रत्येक रस्त्यावर पुरेशा प्रमाणात पथदीप लावण्यात यावेत. विशेषत: मंदिर आणि कुशावर्त परिसरात चांगली प्रकाश व्यवस्था करण्यात यावी. भाविकांना फिरताना त्रास होणार नाही यादृष्टीने मार्गांची रचना करण्यात यावी. नव्याने तयार करण्यात अलेल्या घाटांची माहिती विविध माध्यमांद्वारे भाविकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वरमधील तीन घाट, मंदिर परिसर, कुशावर्त, साधुग्राम आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. साधुग्राममध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती त्यांनी घेतली. तत्पूर्वी क्षत्रिय यांनी शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्र्यंबकेश्वरमधील विकासकामांची माहिती घेतली, भाविकांची संख्या लक्षात घेऊन आवश्यक प्रमाणात पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या़ यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, विशेष पोलीस महानिरीक्षक जे. जे. सिंग, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
कुंभमेळ्याच्या कामांची मुख्य सचिवांकडून पाहणी
By admin | Published: May 28, 2015 11:25 PM