मालेगाव : राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील वडनेर, खाकुर्डी, वळवाडी, विराणे, लुल्ले, टिंघरी, डोंगराळे, भारदेनगर, घाणेगाव, कौळाणे (गा.) या दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर वडनेर येथे भुसे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.तालुक्यात पावसाअभावी टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या परिस्थितील सामोरे जाताना पाणी, चारा, रोजगार हमी योजनेच्या कामांचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन भुसे यांनी दिले. भुसे पुढे म्हणाले की, आता पाऊस आला तरी शेतकऱ्यांच्या हाती पिके येणार नाहीत. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा उपलब्धतेस प्राधान्य देण्यात येईल. गाळ काढणे, नाला रुंदीकरण, खोलीकरण, रस्ता रुंदीकरण आदि कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात येतील. गावपातळीवर किमान पाच कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात येतील, लोकांनी मागणी केल्यास आठ दिवसात कामे उपलब्ध करून देण्यात येतील. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दुष्काळसद्ृष परिस्थिती विशद केली. बैठकीस वडनेर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.