नाशिक : नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालयास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.१२) आरोग्यविज्ञान विद्यापीठातील जागेची पाहणी केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पदव्युत्तर अभ्यासक्रम याच वर्षापासून सुरू करण्यासंदर्भात केंद्राला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी पी.एस. मीना, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, अधीक्षक अभियंता शरद राजभोज, महावितरणचे अधीक्षक अभियंता दारोळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक अधिकारी डॉ. संदीप गुंडरे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी आदी उपस्थित होते.
आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी भुजबळ यांनी सांगितले की, नाशिक येथे १९९९ मध्ये महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची मागणी वारंवार केली जात होती. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. हे महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे ६२७ कोटी ६२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतुदीनुसार अभ्यासक्रमांचे व इतर शुल्क निश्चित करून आकारणी करण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठीच्या सर्व बाबींच्या सूक्ष्म आराखड्यासह प्रस्ताव तत्काळ केंद्र शासनास सादर करावा. महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ, नाशिक संलग्नित या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास तसेच त्यामध्ये १५ विषयांमध्ये एकूण ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या अधीनस्त पूर्णत: स्वायत्त संस्था असणार आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे मंत्रालयस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने दिलेली मान्यता म्हणजे नाशिकच्या १५१ व्या वर्षात जिल्ह्याच्या शाश्वत आरोग्यासाठीची व विकासाची ही पायाभरणीच असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्यविज्ञान विद्यापीठाला तत्काळ भूखंड उपलब्ध करून देण्यासोबतच अन्य प्रशासकीय पातळ्यांवरील कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बैठकीच्या सुरुवातीला दिली.
--इन्फो--
विद्यापीठ आवारातील जागेस मान्यता
महाविद्यालय व रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक जागा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार बैठक संपल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी विद्यापीठाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह विद्यापीठाच्या आवाराला लागून असलेल्या प्रस्तावित जागेस प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी स्वतंत्र आर्किटेक्टद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाने या महाविद्यालयाच्या भूखंडाचा विचार करून आराखडा तयार करावा, अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या.