लोहोणेर : येथील कोरोना विलगीकरण कक्षाची पाहणी जिल्हा परीषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी गुरुवारी( दि.२९) करत समाधान व्यक्त केले.
दरम्यान कोविड १९ च्या सर्वेक्षणासाठी देवळा तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषदेचे व माध्यमिक शाळेतील शिक्षक याचे १८ पथक नेमण्यात आले आहेत.या पथकाने दररोज किमान १०० घरांना भेटी देऊन सर्वेक्षणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सदर सर्वेक्षण हे सात दिवसात पूर्ण करावयाचे असल्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. या कामकाजात हलगर्जीपणा व कामचुकारपणा केल्यास बडतर्फ करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.लोहोणेर गावात एकूण ३४९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर प्रत्यक्ष ॲक्टिव्ह रुग्ण १३४ असून स्थानिक विलगीकरण कक्षात ३४ रुग्ण समाविष्ट केले आहेत. उर्वरित रुग्ण हे देवळा व उमराणे येथील कोरोना केअर सेंटर व काही रुग्ण गृह विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. आतापर्यंत १५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना सर्वेक्षण पथकास सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी नायब तहसीलदार बनसोडे, गटविकास अधिकारी महेश पाटील, नोडल अधिकारी प्रशांत अडागळे, विस्तार अधिकारी जयवंत भामरे, सर्वेक्षण अधिकारी एन.यू. कुळवे, मंडळ अधिकारी राम परदेशी, एकात्मिक बाल विकास अधिकारी एम.एच. भोये, योगेश पवार, रमेश आहिरे, ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार, समाधान महाजन, अंगणवाडी सेविका, जि.प. शिक्षक, आशा वर्कर, मदतनीस आदी उपस्थित होते.माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत लोहोणेर गावात सर्वेक्षणसाठी तपासणी पथक नेमण्यात आले असून या कामकाजात कोणी हलगर्जीपणा अथवा जाणीवपूर्वक कामचुकारपणा केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येईल.- पूनम पवार, सरपंच, ग्रामपंचायत, लोहोणेर.