नाशिकरोड : महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको कोविड रुग्णालयात नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास बिटकोचे प्रवेशव्दार फोडून रुग्णालयाचे नुकसान केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी रुग्णालयाला भेट देऊन कर्मचारी, डॉक्टर तसेच रुग्णांची विचारपूस करत त्यांचे मनोधैर्य वाढवले. त्याचबरोबर ताजणे यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.
मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी रविवारी दुपारी बाराच्या सुमारास रुग्णालयात येऊन नुकसानीची पाहणी करून माहिती घेतली. विविध विभागांना भेटी देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याशी व रुग्णांशी चर्चाही केली. सर्वांना धीर सोडू नका, प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे आहे. रुग्णांची सेवा सुरूच ठेवा असे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सांगितले. मनपा आयुक्तांनी शनिवारी रात्री झालेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यानंतर एमआरआय मशीनची पाहणी केली. तोडफोड प्रकरणाची सविस्तर महिती डॉ. जितेंद्र धनेशवर यांच्याकडून घेतली.