नाशिक (सुयोग जोशी) : आगामी सिंहस्थाच्या पाश्व'भूमीवर महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी पंचवटी परिसरात कोणती कामे प्राधान्याने हाती घ्यावी, तसेच कोणती कामे हाती घेणे अतिआवश्यक आहे यादृष्टीने पाहणी केली. पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त (सेवा) स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे सहभागी झाले होते.
यावेळी साधुग्राम येथील उभारण्यात आलेल्या कमानीचे नुतनीकरण व सुशोभिकरण करणे, हनुमान मंदिर परिसरात अनाधिकृतपणे बांधण्यात आलेला श्री शनैश्वर मंदिर गाईचा गोठा तसेच बटुकेश्वर मंदिरालगत झालेले अनाधिकृत बांधकाम व नाशिक मनपाच्या संपादित जागेत होत असलले अतिक्रमण हटविण्याच्या सुचना आयुक्त करंजकर यांनी दिल्या. कपिला-गोदावरी संगम येथे पलिकडच्या तिरावर जाण्यासाठी लक्ष्मण झुला पुलाच्या जागेची पाहणी केली. त्याच समवेत भुयारी गटार योजनेची कामे, पाणी पुरवठा विषयक कामे, साधुग्रामला होणारा पाणी पुरवठा , विद्युत विषयक कामे मनपाच्या तपोवन येथील बस डेपोची जागा व रस्त्याची पाहणी यावेळी केली. तपोवन येथील मनपाचे मलशुध्दीकरण केंद्र येथे पाहणी करून त्या संबंधीची माहिती करंजकर यांनी घेतली.