सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील दहीवाडी शिवारात गोदावरी उजव्या कालव्यास पडलेले भगदाड बुजविण्याचे काम बुधवारी दुपारी सुरू करण्यात आले. आमदार राजाभाऊ वाजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तातडीने कालव्याला पडलेल्या भगदाड दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या.दहीवाडी शिवारात गोदावरी उजवा कालव्यावरील मोरीचे जुने दगडी बांधकाम तुटून कालवा फुटल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली होती. कालवा बंद करेपर्यंत सुमारे १०० क्यूसेक पाणी वाया गेले होते. कालव्याचे पाणी शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने त्यांच्या पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे तातडीने कालवा बंद करण्यात आला होता.बुधवारी सकाळी आमदार राजाभाऊ वाजे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बाफना यांनी घटनास्थळी भेट दिली. कालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी दिसून आले. वाजे यांनी तातडीने कालवा दुरुस्त करून रब्बीसाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. याठिकाणचे ढाबे वाहून गेल्याने जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या जलवाहिन्या आणण्यात आला असून, त्यावर जेसीबीच्या साहाय्याने भराव टाकण्यात येणार आहे. सदर काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
अधिकारी, आमदारांकडून पाहणी : तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना
By admin | Published: February 19, 2015 12:03 AM