नाशिक : जिल्ह्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही दिवसांत अडीच लाख कुटुंबातील सुमारे साडेबारा लाख लोकांची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीदरम्यान १७ रुग्ण कोरोनाबाधित सापडल्याने त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांनी काल जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची आॅनलाइन बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील साथरोगाची परिस्थिती, उन्हाळ्यात उद्भवणारे आजार त्यावर कारवाई याचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर लसीकरण व औषध पुरवठा याची माहिती घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी केली जात असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात ३५१६ आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २,५४,८५३ कुटुंबांची घरोघरी जाऊन पाहणी करण्यात आली. त्यात १२,५९,५४७ इतक्या नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या दरम्यान १७ कोरोनाबाधित रुग्ण ग्रामीण भागात असल्याने त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, असे सांगण्यात आले.जिल्ह्यात १७ कंटेन्मेंट झोन करण्यात आले असून, ज्या ठिकाणी रुग्ण सापडतो तेथे ३ किलोमीटर अंतरावर हा कंटेन्मेंट झोन लागू करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, थर्मामीटर आदी साहित्याचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या कामाबद्दल सभापती दराडे यांनी समाधान व्यक्त केले व कोरोना संक्रमण टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यात साडेबारा लाख नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:09 PM