लासलगाव : शासनाने कांदा व्यापाऱ्यांकडे असलेल्या कांदा साठ्यावर लक्ष केंद्रित केले असून, शुक्रवारी येथे तसेच पिंपळगाव बसवंत येथील कांदा खळ्यांवर साठ्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान, लाल कांद्याने दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.लासलगाव परिसरातील कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांच्या कांदा खळ्यावर किती कांदा आहे व तो शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आहे का, याची तपासणी निफाड येथील सहकार खात्याचे सहायक निबंधक अभिजित देशपांडे यांच्या विशेष पथकाने केली; परंतु निर्धारित मर्यादेच्या आतच कांदा असल्याने हे पथक परतले. तसेच पिंपळगाव बसवंत येथेही हे पथक गेल्याचे समजते, परंतु तेथील माहिती उपलब्ध झाली नाही.बाजार समितीत शुक्र वारी लाल कांद्याच्या आवकेत वाढ होऊन कमाल दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ झाली. ५६७४ क्विंटल लाल कांदा किमान २५०० ते कमाल १००६४ व सरासरी ७३०० रुपये दराने विकला गेला. गुरुवारी ३११ वाहनांतील ३२७४ क्विंटल लाल कांद्याचा लिलाव झाला होता. दि. ७ रोजी शनिवार असल्याने कांदा लिलाव फक्त सकाळच्या सत्रात सुरु राहणार आहेत.
लासलगाव, पिंपळगावी कांदा साठ्याची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 1:48 AM