सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९, १० व २६मध्ये ठेकेदारमार्फत रस्ता रुंदीकरणाची कामे झपाट्याने सुरू आहेत. मात्र, ही कामे नियमानुसार होत नसून, निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप स्थानिक नागरिक गणेश मेहेत्रे व कमलाकर ह्याळीज या नागरिकांनी केला आहे. थेट मुख्यमंत्र्यांसह, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, उपअभियंता डी. एस. कोल्हे, शाखा अभियंता संजय घोलप यांना बरोबर घेत प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी (पपय्या नर्सरीजवळ आणि अशोकनगर येथे) जाऊन पाहणी केली. मजुरांमार्फत खडीकाम खोदून कामाचा दर्जा तपासला. सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात १४ इंच खडीच्या लेअरऐवजी काही ठिकाणी ६ ते ८ इंच खडीचा थर आढळून आला. साईडपट्टी कोरल्यानंतर त्या ठिकाणी प्रथम दगड व त्याखाली मुरुम आवश्यक असताना थेट काळी माती आढळून आल्याने अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी नाराजी व्यक्त केली. सुजाण नागरिकांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीअंशी तथ्य आढळून आल्याने संबंधित ठेकेदारास तत्काळ मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. यावेळी तक्रारदार नागरिक कमलाकर ह्याळीज, गणेश मेहेत्रे आदीसह नागरिक उपस्थित होते.
इन्फो===
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या समोरच मेसर्स सोनजे असोसिएटचे संचालक प्रशांत सोनजे व तक्रारदार कमलाकर ह्याळीज यांच्यात कामाच्या दर्जावरून शाब्दिक चकमक झडली. रस्त्याच्या कामात नवीन तंत्रज्ञानाचा कुठे आणि कसा वापर होत आहे. याची माहिती नागरिकांनी विचारली. अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला.
इन्फो===
रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त खाडे यांच्यासमोर अर्धवट तयार झालेला रस्ता खोदण्यात आला. दरम्यान, काम पूर्ण होईपर्यंत हा खड्डा बुजवू नये. संपूर्ण डांबरीकरण झाल्यानंतर या कामाचा दर्जा तपासूनच हा खड्डा बुजवण्याचे आदेश दिले जातील, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिले.
(फोटो २८ रोड) सातपूर परिसरातील रस्त्याच्या कामाची जागेवर पाहणी करताना मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, समवेत कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, डी. एस. कोल्हे, संजय घोलप, प्रशांत सोनजे, कमलाकर ह्याळीज, गणेश मेहेत्रे आदींसह नागरिक.