पेठ : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने मंगळवारी पेठ तालुक्याचा दौरा करून शासकीय योजनांची पाहणी केली. या समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा, आ. श्रीनिवास वनगा, आ. किरण सरनाईक आदींनी अधिकाऱ्यांसमवेत करंजाळी येथे कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण उपअभियान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अवजारांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. महाडीबीटी योजनेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर लाभार्थी निवडीची कार्यवाही करावी, अशी मागणी पद्माकर कामडी यांनी केली. पेठ येथील शासकीय विश्रामगृहावर जि.प. सदस्य भास्कर गावीत यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व विद्यार्थी संघटना प्रतिनिधींनी समिती सदस्यांचे स्वागत करून विविध मागण्यांचे निवेदन दिले. दुपारच्या सत्रात वांगणी येथील आश्रमशाळेवर सुरू असलेल्या खावटी वाटप कार्यक्रमास भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार संदीप भोसले, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, गटविकास अधिकारी श्रीकांत खताळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
------------------
करंजाळी येथे शेतकरी लाभ योजनांची पाहणी करताना अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा, श्रीनिवास वनगा, किरण सरनाईक आदी. (२४ पेठ ४)
240821\24nsk_23_24082021_13.jpg
२४ पेठ ४