नाशिक : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले राज्यातील बहुतांश गड-किल्ले अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत असून या गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यापासून सुमारे १०० किल्ल्यांना भेटी देण्याचा मानस आहे. याचा शुभारंभ नाशिकमधून करणार असल्याची भावना खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली.संभाजीराजे हे रविवारी (दि.३) नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी 'लोकमत'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बोलताना संभाजीराजे म्हणाले, महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार अन् महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी सातत्याने चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे सागरी दुर्ग पर्यटनालाही अधिक वाव मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी राज्यस्तरीय 'फोर्ट फेडरेशन'ची स्थापना करत राज्य पुरातत्व विभागासोबत सामंजस्य करार करुन या फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची पडझड रोखण्यासा निर्धारही संभाजीराजे यांनी बोलून दाखविला.पदम्दुर्ग येथे जेट्टी तयार करण्यासाठी परवानगीही मिळाल्याची माहितीही संभाजीराजे यांनी यावेळी दिली. दक्षिण भारतातील 'जिंजी' दुर्गाचा विकासालाही प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी 'लोकमत'चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी संभाजीराजे यांचे स्वागत केले. यावेळी प्रशासन विभागप्रमुख राहुल धांदे यांच्यासह त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच लोकमत वृत्तपत्राचे समुह संपादक विजय बाविस्कर यांच्याशीही संभाजीराजे भोसले यांनी मोबाइलवरुन संपर्क साधत बातचित केली. याप्रसंगी छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम उपस्थित होते.
राज्यातील शंभर गड-किल्ल्यांचा पाहणी दौऱ्याचा शुभारंभ नाशिकपासून : संभाजीराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 7:53 PM
राज्यातील दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी राज्यस्तरीय 'फोर्ट फेडरेशन'ची स्थापना करत राज्य पुरातत्व विभागासोबत सामंजस्य करार करुन या फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची पडझड रोखण्यासा निर्धारही संभाजीराजे यांनी बोलून दाखविला.
ठळक मुद्देसागरी दुर्ग पर्यटनालाही अधिक वाव मिळेल असा आशावादगड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा