निवडणुकीसाठी लागणारे बॅलेट आणि कंट्रोल युनिट यांची प्रथम स्तर पडताळणी तहसीलदारांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रभाग संख्येनुसार तसेच राखीव कंट्रोल आणि बॅलेटची आवश्यकता लक्षात घेता दोन्ही मिळून यंत्रांची तपासणी करण्यात आली. कंट्रोल तसेच बॅलेट युनिट सुरू करण्यापासून सील करण्यापर्यंत तसेच सॉफ्टवेअर प्रणालीची चाचपणी करण्यात आली. यंत्राच्या पडताळणीतून सुस्थितीतील यंत्रणे मतदान प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.
गेल्या ४ तारखेला अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. जवळपास दीड हजार उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित सुमारे अकरा हजार जागांसाठी चुरशीची निवडणूक होणार आहे. माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर गेल्या ५ तारखेपासून जिल्ह्यात निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी प्रचारपत्रके तसेच वैयक्तिक गाठी-भेटीवर भर देत प्रचाराला सुरुवात केली आहे.
--इन्फो-
नाशिक तालुक्याचे आज प्रशिक्षण
निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शनिवार, ९ रोजी सकाळी आयोजित करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथे सकाळपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनतळाची व्यवस्था डेांगरे वसतिगृह मैदान येथे करण्यात आलेली आहे. दुसरे प्रशिक्षण पुढील १४ तारखेला तहसील कार्यालयात पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
(फोटो:आर:०८ग्रामपंचायत इलेक्शन)