पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील मौजे वीरशेत येथे वसुंधरा पाणलोट विकास क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत झालेल्या कामांची दखल घेऊन या कामांची यशोगाथा इतरांपुढे पोहोचविण्यासाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथील पाणलोट व्यवस्थापन केंद्राचे प्रकल्प समन्वयक भास्कर मुंडे व सहकारी तिचा अभ्यास करीत आहेत.यशदा पुणे यांचा दौरा चार टप्प्यात होत आहे. माहिती संकलन, चर्चा व संवाद प्रश्नावली, माहिती संकलन वीरशेत गाव व क्षेत्रीय भागांचे चित्रीकरण असे अभ्यासदौऱ्याचे टप्पे आहेत. पुणे येथील अभ्यास पथकाने वीरशेत गावातील पाणलोट विकास कामांची पाहणी करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. गावातील ज्या शेतकऱ्यांची जमीन सपाटीकरणाची कामे झालेली आहेत ते शेतकरी पारंपरिक नागली, वरई यासारखी पिके सोडून भात, स्ट्रॉबेरी, घेवडा, टमाटा, सोयाबीन, कांदा अशी नगदी पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे गावातील आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावले. अशा आदिवासी शेतकऱ्यांच्या मुलाखती चित्रित करण्यात आल्या आहेत.बचतगटांचे व भूमिहीन शेतकऱ्यांचे त्यांच्या व्यवसायासह चित्रीकरण करून त्यांचे अभिप्राय घेण्यात आले आहेत. यशदा पुणेच्या पथकाला उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, कृषी पर्यवेक्षक किशोर भारते, कृषी सहायक सुधाकर चव्हाण, कांतीलाल पवार, हर्षल सोनवणे, परशराम ठाकरे, धवळू गावित, नारायण गवळी, जगन गवळी यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
वीरशेतला पाणलोट विकासकामांची पाहणी
By admin | Published: September 11, 2015 10:32 PM