नाशिक : जिल्ह्यातील निफाड, पेठ, सटाणा, मनमाड येथे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ आमदार पंकज भुजबळ, राहुल अहेर यांनी या नुकसानीची पाहणी केली़ मनमाड - सर्व पिकांच्या नुकसानींना केंद्रबिंदू मानून पंचनामे करा, अशा सूचना तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ यांंनी प्रशासनाला दिल्या आहेत. या अस्मानी संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने परिसरातील भालूर, एकवई, धनेर, कोंढार, मोहेगाव, नवसारी आदि गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली असून, शेतांमध्ये गारांचा खच पडला होेता. या पावसामुळे कांदा, गहू, हरबरा याबरोबरच द्राक्ष व डाळींबबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षवेलींना लागलेल्या घडांवर गारा पडल्याने द्राक्षमण्यांना भेगा पडल्या आहेत.तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ यांनी भालूर येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पिकांची पाहणी केली. येथील द्राक्ष बागायतदार नामदेव शिंदे यांच्या बागेवर प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दरवर्षी होणाऱ्या बेमोसमी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरात यावर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून, या बेमोसमी पावसामुळे कांद्याचे पीक शेतात आडवे झाले आहे. काही ठिकाणी काढणीस आलेल्या कांद्यावर गारपीट झाल्याने कांद्याच्या पातीचे शेंडे खुडले गेल्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याची वेळ आली आहे. या सर्व पिकांची पाहणी करण्यात आली. या झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडे सर्वतोपरी प्रयत्न करून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, सरपंच संदीप अहेर, तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर, नामदेव शिंदे, दिगंबर निकम, धनंजय कमोदकर, रमेश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.खळ्यातील पिकांचे नुकसानपेठ : शहरासह तालुक्याला बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून, शेतातील व खळ्यावरील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे़बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वातावरणात प्रचंड वादळ तयार झाले आणि काही क्षणातच आभाळ फाटल्यागत गारांचा खच पडू लागला़ यामुळे पेठच्या व्यावसायिकांना आपली दुकाने आवरताना चांगलीच धावपळ करावी लागली़ विजांच्या प्रचंड कडकडाटाने आसमंतात आवाज घुमत होते़कांदा, द्राक्षपिकाचे नुकसाननिफाड : मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील काही गावांतील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे निफाड तालुक्यात ५४ हेक्टर द्राक्षपीक, ४५ हेक्टर कांदा, ७३३ हेक्टर गहू, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती तहसीलदार संदीप अहेर यांनी दिली. ओझर, रसलपूर, श्रीरामनगर या परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या विक्र ीस आलेल्या द्राक्षबागा वादळी पावसाने कोलमडून पडल्या. वरील द्राक्ष उत्पादकांचे या पावसामुळे सुमारे ७० लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या गहू, कांदा पिके काढण्याच्या अवस्थेत असून, नेमके वादळी पावसाने झोडपल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. द्राक्ष काढणी व विक्र ीच्या कालखंडात वादळी पावसाने झोडपल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाला आहे. (लोकमत चमू)
भालूरला उद्ध्वस्त पिकांची पाहणी
By admin | Published: March 03, 2016 10:42 PM