नांदूरशिंगोटे: सिन्नर तालुक्यातील दापूर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दापूर येथे भेट घेऊन गोफणे कुटुंबाचे सात्वंन केले.दापूर येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून काम करणारे शरद रामनाथ गोफणे यांचे गावातच घर आहे. गोफणे हे पत्नी रंजना व मुलगा अविनाश यांच्यासह घराबाहेर झोपले होते. पहाटे घरातून धूर येऊ लागल्याने त्यांनी आरडाओरड केला. अचानक स्वयंपाक घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात गोफणे यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने गोफणे कुटुंबिय घराबाहेर झोपलेले असल्याने अनर्थ टळला. अध्यक्ष सांगळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सर्वातोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सरपंच मुक्ता मोरे, उपसरपंच अशोक काळे, कचरू आव्हाड, ग्रामसेवक प्रदीप काशीद, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष सांगळे यांच्याकडून दापूरला पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 5:53 PM