नाशिक : तत्कालीन शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचे सक्षम महिला नेतृत्व व आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या महिला नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्मयोगिनी डॉ. शांताबाई दाणी चरित्रग्रंथाचे प्रकाशन रविवारी (दि.३०) करण्यात आले. दाणी यांचे चळवळीतील कार्य प्रेरणादायी असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्राचे करुणासागर पगारे यांनी व्यक्त केले.बुद्धसागर बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेतील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित चरित्रग्रंथ प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीचे डॉ. सुधाकर बोकेफोडे, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे, प्रा. गंगाधर अहिरे, तर अध्यक्षस्थानी करुणासागर पगारे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय अहिरे लिखित डॉ. शांताबाई दाणी चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.हा चरित्रग्रंथ प्रेरणादायी ठरणार आहे, मात्र भावी पिढीचा विचार करता हा ग्रंथ वैश्विक पातळीवर पोहचवावा तसेच इंग्रजीमध्येही ग्रंथाचा अनुवादाचा प्रयत्न जवळच्या काळात होणे आवश्यक असल्याची सूचना बोकेफोडे यांनी यावेळीकेली.यावेळी सूर्यवंशी, देवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत दाणी यांच्या स्मृतींना उजाळा दिला. लेखक संजय आहिरे यांनी पुस्तक निर्मिती व लेखनाचा प्रवासाविषयी माहिती दिली. प्रास्ताविक रोहित गांगुर्डे, तर सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी केले.शांताबाई दाणी यांच्यासोबत चळवळीत काम केले असून, त्यांच्या कार्यावर केलेला लिखाणाचा पहिला प्रयत्न उत्तमच आहे; मात्र या ग्रंथाची दुसरी आवृत्तीदेखील प्रकाशित करण्याचा प्रयत्न भविष्यातहोणे गरजेचे असल्याचे करुणासागर पगारे म्हणाले.
शांताबाई दाणी यांचे चळवळीतील कार्य प्रेरणादायी : करुणासागर पगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 1:00 AM