नाशिक : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ॥ असे देवीचे स्तवन करत आणि देवीचा उदो उदो करीत शहरात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळे आणि शहराची ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिरात शनिवारी (दि. १) मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना करण्यात आली. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेला सुरुवात झाली असून, घरोघरी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेमुळे शहरात शनिवारी सकाळपासून विशेष लगबग बघायला मिळाली. नाशिक शहराची ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात शनिवारी पहाटे साडेपाच वाजेपासूनच मंत्रोच्चाराने धार्मिक वातावरण निर्मिती करण्यात आली होती. शहराचे महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात येऊन नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. शनिवारी पहाटे ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात कालिका देवी मंदिर ट्रस्ट विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी सपत्नीक कालिका देवीच्या पादुकांचे पूजन तसेच देवीची महापूजा केली. दरम्यान, सकाळी मंजूळ शहनाईचे वादन करून भक्तिमय वातावरणात भूपाळी आणि भैरवींचे सादरीकरण करण्यात आले तसेच महिला भजनी मंडळींनी देवीचे पाठ आणि विविध स्त्रोतांचे पठण केले. शनिवारी घटस्थापनेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच माळेला कालिका देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. यावेळी कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, खजिनदार सुभाष तळाजीया, विश्वस्त परमानंद कोठावळे, किशोर कोठावळे, आबा पवार, विजय पवार, माजी नगरसेवक दत्ता पाटील, सुरेंद्र कोठावळे आदि उपस्थित होते.दरम्यान, शहरातील पंचवटी येथील गोदाकाठावरील सांडव्यावरची देवी मंदिरातही मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना करण्यात आली. सकाळी साडेसहा वाजता मंदिराचे चंद्रकांत राजेबहाद्दर यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. यावेळी घटस्थापनेनिमित्त मंदिरावर नूतन झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. नवरात्रीनिमित्त या मंदिरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी महिलांनी भजने म्हटली. दरम्यान, सकाळी पाऊस पडल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची पावसामुळे काहीकाळ धांदल उडाली. (प्रतिनिधी)
आदिशक्तीची प्रतिष्ठापना
By admin | Published: October 01, 2016 11:40 PM