लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी (दि. १०) सकाळपासून कुटुंबातील सर्व सदस्य तयारीला लागले होते.
लाडक्या गणरायाचे घरी आणि मंडळाच्या ठिकाणी आगमन होताच पुष्पवृष्टी तसेच गुलाल उधळण करून मोदक, खिरापत वाटप करून घरगुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी गणेशचतुर्थीला सार्वजनिक मंडळ सवाद्य मिरवणूक काढतात. त्या मिरवणुकीत शेकडो गणेशभक्त पारंपरिक वेशभूषा करून सहभागी होतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशभरात कोरोना सावट असल्याने शासनाने उत्सवावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे गाजावाजा न करता मात्र उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पांच्या आगमनासाठी घराघरात सजावट, सुग्रास भोजन बनविण्याचे काम सुरू होते. दुपारी ठरलेल्या मुहूर्तावर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पंचवटीत ९० पेक्षा अधिक छोट्या-मोठ्या मित्रमंडळांनी गणेश प्रतिष्ठापना केली. गणेशमूर्ती स्टॉलवर सकाळपासून भक्तांनी मूर्ती खरेदीला गर्दी केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चौकाचौकातून श्रींची मूर्ती नेणारे गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत होते. लाडक्या बाप्पांना दुचाकी, चारचाकी वाहनातून खांद्यावरून नेत असल्याचे दिसून आले.
पंचवटीतील गजानन चौक, सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळ, गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ, मालेगाव स्टँड मित्रमंडळ, भगवतीनगर कला क्रीडा मंडळ, नवीन आडगाव नाका, कृष्णनगर, त्रिमूर्तीनगर, गुरुदत्त सामाजिक मंडळ, सत्य बाल, भगवती, कैलास मित्रमंडळ, विक्रांत, यंगस्टार नागचौक, कै. दत्ताजी मोगरे फ्रेंड सर्कल, दुर्गा फ्रेंड सर्कल, एसएफसी फ्रेंड सर्कल, अयोध्यानगरी, सरदारचौक संजयनगर मालवीय चौक, आरटीओ कॉर्नर मित्रमंडळ, पेठरोड मित्रमंडळ आदिंसह हिरावाडी, मेरी, म्हसरूळ, आडगाव, नांदूर, मानूर, आरटीओ, जुना आडगाव नाका, मखमलाबाद, रामवाडी, दिंडोरीरोड, भागातील गणेशोत्सव मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली.