नाशिक- गोदावरी नदी प्रदुषीत असल्याने त्यातील मलजलावरून पाणवेली उभ्या राहत आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे अस्तित्व धोक्यात आले असताना या पाणवेलीपासून घरगुती वापरायच्या वस्तू तयार करण्याचे काम जिल्हा परीषदेने एका बचत गटामार्फत सुरू केले आहे. विशेष म्हणजे ही नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीत गोदावरी प्रदुषीत होऊच नये आणि पाणवेली तयार होऊ नये अशी भूमिका घेणे अपेक्षीत असताना अशा प्रकारचे नाशिक महपाालिकेसह अन्य यंत्रणांनी देखील बचत गटांना प्रशिक्षण द्यावे आणि बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी भूमिका घेण्यात आली आहे.
पाणवेलींच्या अशा व्यवसायिक उत्पादनांमुळे गोदावरी नदी प्रदुषणमुक्त होईल की प्रदुषण वाढेल याबाबत तज्ज्ञांनीच शंका घेतली आहे. नाशिक शहरातून वाहणारी दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदी प्रदुषणमुक्त व्हावी यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून विभागीयआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे यात संबंधित शासकीय यंत्रणा तसेच याचिकाकर्ते आणि तज्ज्ञांचा समावेश आहे. या समितीची बैठक गुरूवारी (दि.२४) पार पडली. यात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाणवेलीपासून वस्तु तयार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अशिमा मित्तल यांचे कौतुक केले तसेच पाणवेलीची उत्पादने तयार करणाऱ्या बचत गटांचा सत्कार करण्यात आला.
गोदापात्रात शहरातील आणि ग्रामीण भागातील सांडपाणी मिसळते या प्रदुषणामुळे पाणवेली तयार होतात. त्यामुळे मलजल मिसळू नये यासाठी प्रकल्प आखण्याची गरज असताना प्रदुषणापासून पाणवेली तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.