लासलगाव : येथील सुसज्ज अशा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष देत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याच्या आरोग्य संचालनालयास पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत.लासलगाव ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आठवड्यातून केवळ तीनच दिवस येत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे आमदार छगन भुजबळ यांनी स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांना या रु ग्णालयाची पाहणी करण्यासाठी पाठविले होते. त्यावेळी तेथे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे लोखंडे यांनी भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून तेथील परिस्थितीचा आढावा दिला. त्यावर भुजबळ यांनी त्वरित आरोग्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात त्वरित पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नेमण्याच्या सूचना केल्या आहेत. याप्रसंगी प्रमोद पाटील, नंदू राऊत, संदीप उगले, महेश बकरे, बालेश जाधव, गणेश इंगळे, सुमंत करवाळ उपस्थित होते. शिवसेना व बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीने डॉ. कोशिरे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. डॉ. कोशिरे यांची वागणूक बेजबाबदार असल्याने त्यांचे निलंबन करावे अन्यथा सोमवारी (दि. २६) सकाळी १० वाजेपासून येथील प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवा सुराशे यांनी सांगितले. (वार्ताहर)
लासलगावी पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नेमण्याच्या सूचना
By admin | Published: October 25, 2015 11:12 PM