सातपूर : निमा पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्यात सभासद शुल्कावरून उद्भवलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर घटनेतील तरतुदी स्पष्ट होत नसल्याने निमा कार्यकारिणी सदस्यांमध्ये झालेल्या वादाविषयी रविवारी (दि.३१) निमा विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निमा अध्यक्षांना २४ तासांत लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.निमा पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्यात सभासद शुल्कावरून वाद निर्माण झाले असून, दोन गट तयार झालेले आहेत. या वादात १७ सदस्यांनी निमा विश्वस्त मंडळाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत विश्वस्त मंडळाचेअध्यक्ष नरेंद्र हिरावत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस धनंजय बेळे, मनीष कोठारी, रवि वर्मा आदी विश्वस्त मंडळ सदस्यांसह निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सरचिटणीस तुषार चव्हाण, माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर आदी उपस्थित होते. यावेळी दाखल झालेल्या तक्रार अर्जाविषयी विश्वस्त मंडळाने निमा अध्यक्षांकडून खुलासा मागतानाच वादाची परिस्थिती समजून घेतली. तसेच घटनेविषयी असलेल्या अडचणीही जाणून घेतल्या.निमा अध्यक्षांनी २४ तासांत विश्वस्त मंडळाकडे लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्त असून, लेखी अहवाल सादर केल्यानंतर त्यावर विचारविनिमय करण्यासाठी मंगळवारी पुन्हा विश्वस्त मंडळाची बैठक घेण्यात येणार आहे.
निमा अध्यक्षांना २४ तासांत लेखी अहवाल सादर करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:24 AM