भगवान गायकवाड
दिंडोरी : तालुक्यात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे असले तरी या रस्त्यांची दुरवस्था होत ते खिळखिळे झाले आहेत. दरवर्षी रस्त्यांवर लाखो रुपये खर्च करून मलमपट्टी केली जाते, मात्र पावसाळ्यात पुन्हा ‘जैसे थे’ निर्माण होत आहे. गेली दहा वर्षे आमदार वेगळ्या पक्षाचे व सत्ता वेगळ्या पक्षाची यामुळे रस्ते विकासाला अपुरा निधी मिळत नूतनीकरणऐवजी डागडुजीवरच भागवावे लागत होते. तालुका सर्वच पातळीवर विकासाच्या दृष्टीने घोडदौड करत असताना त्यास रस्त्याच्या दुरवस्थेने खीळ बसत आहे. आता मात्र मतदारसंघातील आमदारांना विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने सर्वच रस्त्यांचे नूतनीकरण होत रस्त्यांचे भाग्य उजळावे, अशी अपेक्षा तालुक्यातील जनता व्यक्त करत आहे.
तालुक्यातील वलखेड फाटा, ननाशी ,दिंडोरी-उमराळे, दिंडोरी -निळवंडी- हातनोरे, दिंडोरी-मोहाडी, दिंडोरी-पिंपळगाव या प्रमुख रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून, या रस्त्यांवर वाहने चालवणे मोठे जिकिरीचे झाले आहे. या सर्व रस्त्यांची कामे मंजूर असून, दिवाळीत ही कामे सुरू होतील असे सांगितले जात आहे. मात्र या कामांची गुणवत्ता राखणे अपेक्षित आहे. दिंडोरी तालुक्यात औद्योगिकरण व शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने वाहनांची वर्दळ सर्वच रस्त्यांवर लक्षणीय आहे. तालुक्यातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडलेले आहे, परंतु यातील बहुतांशी रस्त्यांची वाताहत झाली आहे. बहुतांशी रस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक आहे. दिंडोरी शहरास जोडणाऱ्या ननाशी, उमराळे, हातनोरे, मोहाडी, पिंपळगाव या रस्त्यांचे मजबुतीकरण व नूतनीकरण गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी या सर्वच रस्त्यांची कामे झाली आहेत. मात्र गुणवत्ता न राखली गेल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. या प्रमुख रस्त्यांसोबतच गावागावांना जोडणारे रस्तेही नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात राजापूर ते लोखंडेवाडी तसेच जोपूळ ते जोपूळ फाटा, जोपूळ ते चिंचखेड, तळेगाव ते इंदोरे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वागदेव फाटा ते म्हेळुस्के ओझे, लखमापूर ते म्हेळुस्के, लखमापूर फाटा ते कादवा कारखाना, बोपेगाव -खेडगाव, खेडगाव-शिंदवड आदी अनेक रस्ते दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. नाशिक-दिंडोरी-वणी या रस्त्याचे चौपदरीकरण होणे अत्यावश्यक आहे. मात्र अक्राळे फाटा ते वणी कळवण रस्त्याचे काम हायब्रीड एन्यूटीतून होत असून, त्यात किरकोळ रुंदीकरण होत आहे व हे काम तीन वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण झाले नाही. विविध त्रुटींमुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू आहे. दिंडोरी शहरात अजून काम सुरू केले नसून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वणी शहरात काम रखडले आहे. चिंचबरी ते अक्राळे रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून, वारंवार मलमपट्टी केली जात आहे. आता आमदार नरहरी झिरवाळ यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत व त्यांनीही सर्वच रस्त्यांचे कामांना मंजुरी मिळवली आहे, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाने निधीच्या कात्रीने वर्ष वाया गेले असून, आता तरी निधी मिळून रस्त्याची कामे होण्याची अपेक्षा आहे. खासदार भारती पवार यांनीही दोन रस्ते पंतप्रधान ग्रामसडक अंतर्गत टाकल्याने त्या रस्त्यांचे भाग्य उजळण्याची अपेक्षा आहे.
इन्फो
ठेकेदारांनी लावली रस्त्यांची वाट
दिंडोरी-उमराळे, दिंडोरी-पालखेड -पिंपळगाव, दिंडोरी-मोहाडी, वलखेड फाटा-ननाशी, लखामपूर फाटा-कादवा-बोपेगाव, खेडगाव-शिंदवड हे रस्ते काही वर्षांपूर्वीच नव्याने झाले, मात्र या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने त्यांची काही दिवसांत वाट लागली. काही रस्त्यांना सीलकोट न केल्याने दुरवस्था झाली. यातील काही ठेकेदारांनी कमी निविदा भरत (बिलो) कामे घेतली. मात्र ती सुरूच केली नाही, तर काहींनी गुणवत्ता राखली नाही. वलखेड फाटा-निगडोळ रस्त्याच्या कामाची तक्रार थेट विधानसभेत झाली, तरीही काही फरक पडला नाही. बांधकाम विभागाने लाखोंची दंडात्मक कारवाई केली, त्यास हे ठेकेदार बधले नाही. त्यांच्या मनमानीमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.
फोटो- १६ दिंडोरी खबरबात
160821\16nsk_11_16082021_13.jpg
फोटो- १६ दिंडोरी खबरबात