पंचवटी : पावसाने दडी मारल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ५५ टक्के पाणी साठल्यामुळे महापालिकेने एक दिवसाचा पाणीपुरवठा कपातीचा निर्णय मागे घेतला असतानाही पंचवटीतील गणेशवाडी परिसरात काही भागात पाणी येत नाही, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी थेट आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्क कार्यालयात ठिय्या मांडला, मात्र तरीही प्रश्न सुटला नाही.गणेशवाडीत गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्यात प्रशासनाने दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केल्याने तेव्हापासून नळाला पाणी येतच नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, कधी गंगाघाटावर जाऊन वापरासाठी पाणी आणावे लागते तर कधी अन्य भागात राहणाºया नागरिकांकडून पाणी मागावे लागते. परिसरात पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी महिलांनी आमदार सानप यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन हकिकत कथन केली. परंतु दुसºया दिवशीदेखील परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने, तर काही भागात झालाच नसल्याने महिलांनी नाराजी दर्शवून संताप व्यक्त केला आहे.पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. यापूर्वी देखील नागरिकांनी विभागीय कार्यालयात तक्रारी केलेल्या आहेत. मात्र पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल असे उत्तर वारंवार मिळत गेले. प्रत्यक्षात मात्र सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढतच गेला. शहरात अन्यत्र एकवेळ पुरेवा पाणीपुरवठा होत असतांना फक्त गणेशवाडी आणि आजुबाजूच्या परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी या संदर्भात थेट आमदाराकडेच आपली भूमिका मांडली.एकीकडे पाण्याची कमतरता असतांना पंचवटीतल काही भागात मात्र पाण्याचा मोठा वापर होत असल्याचे देखील चित्र आहे. शहरात एकवेळ पाणी पुरवठा केला जात असतांनाही अनेक लोक पाण्याचा गैरवापर करीत असल्याकडे देखील नागरिकांनी लक्ष वेधले. सध्या पाणीपुरवठा कमी करण्यात आला असतांना नागरिकांना समान पाणीवाटप होणे अपेक्षित आहे. मात्र काही भागात धो-धो पाणी मिळते आणि गणेशवाडीसह आजुबाजूच्या नागरिकांना कमी दाबाने पाणी दिले जात असल्यामुळे यातून तातडीने मार्ग काढावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.सध्या धरणात कमी जलसाठा असल्याने संपूर्ण नाशिक शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गणेशवाडी येथे कमी पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार असून, लागलीच संबंधित विभागाला पाणीपुरवठा व्यवस्थित करावा, अशा सूचना दिल्या आहेत.- बाळासाहेब सानप, आमदार
आमदाराच्या कार्यालयात ठिय्या देऊनही अपुरे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:36 AM