नाशिक : कामकाजाच्या निमित्ताने नाशिक तलाठी कार्यालयात गेलेल्या एका महिला वकिलास उद्देशून तेथील अधिकाऱ्याने असभ्य वर्तणूक आणि अपशब्दाचा वापर केल्याने, नाशिक बार कौन्सिलकडून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी महिला वकिलांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेतली असता, त्यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
गेल्या गुरुवारी कामानिमित्ताने तलाठी कार्यालयात गेलेल्या महिला वकिलास तेथील अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा प्रकार घडला. संबंधित अधिकाऱ्याने महिला वकिलास उद्देशून अपशब्द वापरलाच, शिवाय त्यांच्यावर आरडाओरडही केल्याने संबंधित महिला वकील या प्रकाराने भयभीत झाली. सदर बाब बास कौन्सिलला कळल्यानंतर, समस्त महिला वकिलांनी संबंधितांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी शुक्रवारी बार कौन्सिलच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. घडलेल्या प्रकाराची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर, त्यांनी तातडीने संबंधित विभागात दूरध्वनी करून घटनेची माहिती घेत, तेथील अधिकाऱ्यास सोमवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
--कोट--
घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. राज्यात स्त्रीशक्ती कायद्याच्या अंमलबाजवणीची प्रक्रिया सुरू असताना, महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला वकिलाबाबत असा प्रकार घडणे धक्कादायक आहे. सुसंस्कृत समाजात स्त्रियांचा सन्मान राखायला हवा. शासकीय अधिकाऱ्यांनीही जबाबदारी ओळखली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय सन्मानपूर्वक बाजू ऐकून घेत, कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
- ॲड.श्यामला दीक्षित, सचिव, नाशिक बार कौन्सिल.