देवगाव : निफाड तालुक्यात उन्हाचा चटका बसू लागला असून, रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मंदावली आहे. दुपारच्या सुमारास नागरिक उन्हाच्या त्रासाने घराबाहेर पडत नसल्याने व्यापारी, दुकानदार व किरकोळ विक्रेते दुकाने बंद ठेवीत आहेत. काही दिवसांपासून तालुक्यातील तपमानात कमालीची वाढ झाली आहे. दुपारी कडक ऊन पडते. कडक उन्हामुळे लोक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घराबाहेर येणे टाळतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची सुरुवातच तीव्र झाल्यामुळे शाळेतून परतणारे विद्यार्थी, वृद्ध महिला व आजारी लोकांना उन्हाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. घरोघरी दुपारी आणि रात्रीही पंखे व कूलर सुरू असतात. उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांचा कूलर खरेदीकडे कल वाढला आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या डेझर्ट कूलरसह नामांकित ब्रॅँडेड कूलरही बाजारात दाखल झाले आहेत. प्रवाशांकडून बाटलीबंद थंड पाण्याची मागणी वाढली असून, आइस्क्रीम, कुल्फी व शीतपेयांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. सरबत, लस्सी, ताक, उसाचा रस आदींना मागणी वाढली आहे. शरीरात गारवा निर्माण करणारे कलिंगड, काकडीसह एसी, कूलर, गॉगल, स्कार्फ खरेदीस नागरिक पसंती देत आहेत. तहान शमवण्यासाठी माठातील थंडगार पाणी पिणे बहुतेकांना आवडते. त्यामुळे उन्हाळ्यात फ्रीज असूनही माठ विकत घेणारे अनेक जण आहेत.डावा कॅनॉलमध्ये पोहणायांची गर्दीदुपारच्या वेळेत झाडाच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी शेतकरी सकाळी लवकर कामे उरकण्याचा प्रयत्न करत आहे. दुपारी कॅनॉल, नदीवर, बंधाºयावर पोहायला जाणाºया मुलांची संख्या वाढली आहे. एकीकडे ऊन, तर दुसरीकडे अधूनमधून विजेचे झटके यामुळे नागरिकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. त्याचबरोबर पशुधनाचेही पिण्याच्या पाण्यामुळे हाल होत आहेत. एप्रिल महिन्यात तपमान वाढले असून, मे महिन्यात काय अवस्था होईल याची चिंता नागरिकांना पडल्याचे दिसून येत आहे.
उन्हाच्या तीव्रतेने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:17 AM