नाशिक : नाशिककरांचा आगामी वीस वर्षांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना कार्यान्वित, बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात दुष्काळी भागाला मिळालेले पाणी, नाशिकहून हैदराबाद आणि सुरतसाठी सुरू झालेली विमानसेवा यांसह अनेक रस्ते, पुलांसारखी विकासाची तसेच दळवळणाची कामे झाली आणि सरत्या वर्षात रखडलेले काही प्रकल्प मार्गी लागले आहेत. शहरातच नव्हे तर जिल्ह्यात झालेल्या या विकासकामांमुळे जिल्हावासीयांचे जीवनमान सुलभ होण्यास मदतच झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा हा आढावा...भगूर बसस्थानकाचा कायापालटभगूर येथील बसस्थानकाला नवसंजीवनी प्राप्त होऊन स्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त निधीतून भगूर बसस्थानकाचा कायापालट झाला आहे. देवळाली मतदारसंघातील भगूर नगरपालिका हद्दीतील भगूर स्थानकातून आजूबाजूचे खेडे तसेच सिन्नर आणि नाशिकसाठी प्रवासी वाहतूक केली जाते. येथील बसस्थानक अत्यंत जुने आणि जीर्ण झाल्यामुळे या स्थानकासाठी खासदार निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून बसस्थानक उभारण्यात आले आहे. दीड वर्ष या स्थानकाचे कामकाज सुरू होते. नव्या बसस्थानकात पाच प्लॅटफॉर्म असून, कंट्रोलर केबीन, अनाउंसिंग सिस्टम, चालक-वाहकांसाठी कक्ष, निवाराशेड, पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून या स्थानकाचे नुकतेच उद्घाटन झाले आणि दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भगूरचे बसस्थाक पुन्हा सुरू झाले. आता प्रश्न केवळ ‘इन आणि आउट’ प्रवेशद्वाराचा आहे. सध्या या जागेत दोन टपºया असून, त्यांच्या जागेचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. दुकानदार स्थलांतरित झाल्यानंतर बसेसला जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्ग असणार आहेत.कन्नमवार पूल उभारला नव्यानेझपाट्याने विकसित होणाºया नाशिक शहराला जवळ आणण्यासाठी तयार झालेले रिंगरोड आणि पुलांमुळे नाशिकचे सौंदर्य वाढले आहे. त्यामध्ये भर पडली आहे ती कन्नमवार नवीन पुलाची. मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत जुना दगडी पूल जीर्ण झाल्याने नवीन पुलाची निर्मिती करण्याचे काम मागील वर्षी हाती घेण्यात आले होते. सदर काम आता पूर्णत्वास आले असून, हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलावरील डांबरीकरण आणि रंगरंगोटीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलासाठी सुमारे ७.५० कोटींचा खर्च आला आहे. प्रीस्ट्रेस्ड या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग पूल उभारण्याच्या कामात करण्यात आलेला आहे. एम-४० ग्रेड, तसेच पायलिंग वर्कचा वापर करून पुलाची उभारणी करण्यात आली आहे. सात पिलरच्या साह्याने हा पूल उभा करण्यात आला आहे.पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा आधारनाशिक जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख निवासीभत्ता योजनेअंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या आवारात वसतिगृह सुरू करण्यात आले. या योजनेतून मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील मुलांना डॉ. पंजाबराव देशमुख निवासीभत्ता योजनेअंतर्गत वसतिगृहात राहण्याचा खर्च दिला जात असून, विद्यार्थ्यांना जेवणाचा खर्च स्वत: करावा लागत आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था होत असल्याने शहरात शिक्षण घेणे शक्य होत आहे. या वसतिगृहाच्या संचलनाची जबाबदारी तंत्रशिक्षण विभागाचे सहायक संचालक यांच्याकडून असून, त्यांच्या नियंत्रणात स्वतंत्र ठेकेदारास हे वसतिगृह चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.अंबडला स्वतंत्र अग्निशमन केंद्र कार्यान्वितअंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. औद्योगिक वसाहतीत लागणाºया आगी व त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी उद्योजकांना नाशिक महापालिकेच्या मुख्य अग्निशामक दलावर अवलंबून रहावे लागत होते. त्यातून औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र केंद्र कार्यान्वित करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात आले. चालू वर्षी या केंद्राचे काम पूर्ण झाले असून, अद्ययावत यंत्रसामग्रीने अग्निशामक केंद्र सुसज्ज झाले आहे. सप्टेंबर महिन्यात सदरचे केंद्र कार्यान्वित करण्यात आले. या केंद्रात २४ तास कर्मचारी तसेच एक अग्निशमन बंबाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे अग्निशमन केंद्र सुरू झाल्याने उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.उडानला लागला मुहूर्त!सुमारे चार ते पाच वर्षे ओझर येथील पॅसेंजर टर्मिनल पडून होते. दीड वर्षापूर्वी उडानच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. नाशिक- मुंबई आणि नाशिक-पुणे अशा विमानसेवेला प्रारंभ झाला आणि नंतर ही सेवा बंद पडली. परंतु याचदरम्यान, नाशिक-दिल्ली या दिवसाआड सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही सेवा भरात असताना काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. नंतर मात्र दुसºया टप्प्यात आंतरराज्य जोडणीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि १ फेब्रुवारीपासून हैदराबाद आणि अहमदाबाद विमानसेवा सुरू झाल्या. या सेवांना इतका चांगला प्रतिसाद मिळाला की, दोन्ही शहरात दररोज विमानसेवा सुरू आहे. हैदराबाद येथे दररोज एक फेरी होते. परंतु अहमदाबादमध्ये जा-ये करणाºया प्रवाशांची संख्या इतकी आहे की, दररोज दोन कंपन्यांच्या एकेक फेºया होत आहेत. याशिवाय एअर डेक्कनची सेवा बंद पडली असली तरी दुसºया कंपनीने नाशिक-पुणे सेवा सुरू केली असून, ही सेवादेखील नियमितपणे सुरू असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.नाशिकरोड न्यायालयाची इमारत पूर्णत्वाकडेनाशिकरोड येथील सध्याच्या न्यायालयाच्या अडचणी लक्षात घेता नवीन इमारतीची गरज होती. त्यानुसार नाशिकरोड जिमखाना रोडवर गेल्यावर्षी जुलै महिन्यात न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. आता ही इमारत पूर्ण झाली असून, फर्निचर आणि अन्य फिनिशिंगची कामे सुरू आहेत. नव्या वर्षात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात नव्या इमारतीतून कामकाज सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. याठिकाणी मोटर वाहन न्यायालयदेखील स्थलांतरित होणार आहे. नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली पोलीस ठाण्यांतर्गत याठिकाणी फौजदारी आणि दिवाणी दावे चालतील. याशिवय सिन्नर व इगतपुरी येथील फौजदारी न्यायालयातील निर्णयानंतर अपिलीय कोर्ट म्हणूनसुद्धा या न्यायालयात वरिष्ठ न्यायालय सुरू करण्याबाबत प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे.गंगापूर एसटीपी कार्यान्वितगोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याने महापालिकेने सर्व प्रकारचे सांडपाणी प्रक्रियेनंतरच नदीपात्रात सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यात गंगापूर गावाचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र हा महत्त्वाचा भाग होता. सुमारे १८ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन प्रक्रियेचे केंद्र साकारण्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. मात्र सरत्या वर्षात हे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील सांडपाणी आता प्रक्रियेशिवाय नदीपात्रात जात नाही. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी नाल्याद्वारे गोदावरी नदीत जात असते. ते पाणी गंगापूर एसटीपीमध्ये नेऊन तेथे प्रक्रिया केली जाते. आता परिसरातील गोवर्धन गावचे सांडपाणीदेखील या एसटीपीत संबंधित ग्रामपंचायतीने आणून दिल्यास विनामूल्य त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
मुकणे जलवाहिनी, मांजरपाडा ते आंतरराज्य विमानसेवा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:32 AM