नाशिक : जिल्हा परिषद निवडणुका लढविण्यासाठी इच्छुकांकडून वेगवेगळया क्लृप्त्या आणि अजब फंडे लढविण्यास सुरुवात झाली आहे. काहींनी गटात निवडून येण्यासाठी स्थानिक उमेदवारच हवा अशी टूम उठविली आहे, तर काही उमेदवारांनी निवडणुकांमध्ये आपले पारडे जड होण्यासाठी विविध समाजमंदिरांसाठी देणग्या देण्यास सुरुवात केली आहे.जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांच्या सुप्त इच्छांना धुमारे फुटू लागले असून, आपणच कसे आपल्या पक्षाकडून योग्य उमेदवार आहोत, हे इतरांना पटवून देण्यासाठी इच्छुकांची दमछाक होऊ लागली आहे. काही इच्छुकांनी तर या गटात आपण स्वत: लढावे की अन्य गटातून आपल्या कुटुंबातील महिला उमेदवार उभी करावी, असा विचार सुरू केला आहे. अमुक एका मोठ्या गावाचे मतदान पाच ते सात हजार असल्याने संबंधित गावाच्या अमुक मंदिराला देणगी जाहीर केल्यास ग्रामस्थ निवडणूक बिनविरोध करणार आहेत अशा चर्चा सुरू असून, काही इच्छुकांनी या मंदिरांसाठी देणग्या गोळा करण्यास आणि खिशातून देण्यास सुरुवात केली आहे. येवला तालुक्यातील पाटोदा गटातून स्थानिक उमेदवार दिल्यासच त्या त्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो. इगतपुरी तालुक्यातील घोटी गटातून अमुक एका जातीचा उमेदवार निवडून येत नाही, निवडणुकांच्या तारखा घोषित होण्यास आणि प्रत्यक्ष मतदानाची तारीख निश्चित होण्यास बराच अवधी शिल्लक असताना आतापासून राजकीय ठोकताळे बांधण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांचा रणसंग्राम चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
इच्छुकांचे निवडणुका लढविण्याचे अजब ‘फंडे’
By admin | Published: October 27, 2016 12:15 AM