मालेगाव : येथील महानगरपालिकेने आरोेग्य विभागाच्या अंतर्गत कुष्ठ व क्षयरोग विभागाच्या क्षयरोग नियंत्रण सोसायटीतर्फे शहरात कुष्ठ व क्षयरोग निदानाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे मानधन दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात क्षयरोग नियंत्रणाचे काम करण्यासाठी १४ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासन महानगरपालिकेला अनुदान देते. त्या अनुदानातून कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते; मात्र गेल्या पाच महिन्यांपासून शासनाने अनुदान न दिल्याने उपासमारीची वेळ आली होती. त्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील संबंधित विभागाच्या सहसंचालकांनी १४ आॅक्टोबर २०१४ रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून अनुदान प्राप्त होईपर्यंत आपल्या फंडातून सदर कर्मचाऱ्यांचे मानधन देण्याचे सूचित केले होते. यासाठी इतर महापालिकांनी सकारात्मकता दाखवत एक महिन्याचे मानधन दिले होते; मात्र येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील स्वयंघोषित अधिकाऱ्याच्या आडमुठे धोरणामुळे महापालिका आयुक्तांनी दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखवित कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आले नव्हते. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच येथील कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे मानधन देऊ केले आहे. (प्रतिनिधी)
दखल : मालेगाव महानगरपालिकेच्या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह
By admin | Published: December 23, 2014 10:09 PM