सिन्नर: मविप्र संचलित येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांची काठमांडू (नेपाळ) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.गुरूग्रांम हरियाणा येथे पार पडलेल्या खेळ महाकुंभ अंतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत वाजे विद्यालयातील शुभम बोकड याने ६५ किलो वजनी गटात व हेमंत पाटील याने ४५ किलो वजनी गटात यश मिळवून सुवर्णपदक मिळविले. १० एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत काठमांडू नेपाळ या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या दोघांची निवड झाली आहे. त्यामुळे सिन्नरचे नाव आंतरराष्टÑीय पातळीवर पोहोचणार आहे. सदर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व त्यांना मदत व्हावी या हेतूने वाजे विद्यालयातील सर्व शिक्षकांनी त्यांना आर्थिक मदत करण्याचे ठरवले. तसेच सिन्नर सांस्कृतिक मंडळ यांनी खेळाडूंना मदतीचा हात दिला. एकेकाळचे राज्यस्तरीय खो-खो खेळाडू व नगरपालिकेचे नगरसेवक रामभाऊ लोणारे यांनीही खेळाडूंना आर्थिक मदत केली. यशस्वी खेळाडूंचे संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार, तालुका संचालक हेमंत वाजे, शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, संस्थेचे शिक्षणाधिकारी एस. डी. शिंदे यांनी कौतुक केले.
वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांची आंतरराष्टÑीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 5:37 PM