सिन्नर : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू तथा पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे यांनी सिन्नर येथील जिजाऊ क्रीडा प्रबोधिनीला भेट देऊन तेथील कार्यपध्दतीची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्राला पहिलवान खाशाबा जाधव यांच्यापासूनची कुस्तीची यशस्वी परंपरा आहे; मात्र महिलांना या क्षेत्रात यायला बराच कालावधी जावा लागला, असे सांगत राहुल आवारे यांनी कुस्तीपटू भक्ती व स्वरदा आव्हाड भगिनींच्या खेळाचे कौतुक केले.सिन्नरच्या राष्ट्रीयस्तरावर उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या व खेलो इंडियासारख्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या कुस्तीपटू पहिलवान आव्हाड भगिनींना कुस्तीमध्ये वाव असल्याचे ते म्हणाले. क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष रामकृष्ण आव्हाड यांनी प्रास्ताविक केले. सचिव रवींद्र कांगणे यांनी आभार मानले. दरम्यान, आवारे यांचा जिजाऊ क्रिडा प्रबोधनीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिन आव्हाड, सहादू कांदळकर, सचिन लहामगे, सविता आव्हाड, सारिका कांगणे, वैशाली कांदळकर, जिजाऊ क्रीडा प्रबोधिनीचे मल्ल साई आव्हाड, मनस्वी कांगणे, श्लोक कांगणे, सावली कांदळकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडील रामकृष्ण आव्हाड यांच्याकडून कुस्तीचे धडे बालपणापासून त्या गिरवत आल्या. त्याचीच परिणती त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल राहुल आवारे यांनी दोघी भगिनींची भेट घेतली. कुस्तीतील बदल व महत्त्वाचे नियम, त्याचबरोबर कुस्तीसाठी आवश्यक आहार तसेच इतर अनेक विषयांवर मार्गदर्शन आवारे यांनी केले.