नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि. १२) एकूण ९८ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून १३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात नाशिक मनपा क्षेत्रात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६०४ वर पोहोचली आहे.
नव्याने झालेल्या बाधितांमध्ये रविवारीदेखील नाशिक ग्रामीणच्याच रुग्णांची संख्या नाशिक मनपाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. नाशिक मनपाचे २६ तर नाशिक ग्रामीणचे ५९ रुग्ण बाधित आणि जिल्हाबाह्य १३ रुग्ण बाधित झाले आहेत. नवीन बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त अधिक असल्याने एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ८२० वर आली आहे. त्यात ४७३ नाशिक ग्रामीणचे ३०९ नाशिक मनपाचे २१ मालेगाव मनपा, १७ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा पाचशेपेक्षा कमी होऊन ४०१ वर आली आहे.
इन्फो
पॉझिटीव्हीटी रेट ३ टक्क्यांनजीक
जिल्ह्यात रविवारी बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त अधिक आले असले तरी रविवारचा बाधित दर अर्थात पॉझिटीव्हीटी रेट २.९९ टक्के म्हणजेच ३ टक्क्यांनजीक पोहोचला आहे. पॉझिटीव्हीटी रेटमधील वाढ आणि गत आठवडाभरापासून वाढत असलेली गर्दी आरोग्य विभागासह प्रशासनाच्या डोकेदुखीत भर घालणारी ठरण्याची शक्यता आहे.