आंतरराज्यीय टोळी ताब्यात : वऱ्हाडी बनून यायचे अन‌् दागिने लंपास करुन पळून जायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 08:35 PM2021-01-02T20:35:13+5:302021-01-02T20:37:27+5:30

मध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती.

Interstate gangs in custody: used to flee as brides | आंतरराज्यीय टोळी ताब्यात : वऱ्हाडी बनून यायचे अन‌् दागिने लंपास करुन पळून जायचे

आंतरराज्यीय टोळी ताब्यात : वऱ्हाडी बनून यायचे अन‌् दागिने लंपास करुन पळून जायचे

Next
ठळक मुद्देइंदुरमधील ढाब्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने बांधल्या मुसक्यामध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी लग्नसोहळ्यातून १६ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ४० हजाराची रोकड चोरी

नाशिक : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहर व परिसरातील सुरु झालेल्या विविध लग्नसमारंभांमध्ये मौल्यवान दागिने चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यामुळे गुन्हे शाखेची पथके घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला यश आले. वऱ्हाडीचा बनाव करत लग्नाला उपस्थित राहून तेथे रेकी करत मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या पोलिसांनी मध्यप्रदेशच्या इंदुरमधून आवळल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, डिसेंबर महिन्यात गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉन्समध्ये पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यातून १६ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ४० हजाराची रोकड चोरी गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी योगिनी कातकाडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना शहरात कुठल्याहीप्रकारचे धागेदोरे मिळत नव्हते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाला याबाबत माग काढण्याचे आदेश दिले. पथकाने समांतर तपास सुरु केला; मात्र गुन्ह्याची कार्यपध्दती अत्यंत वेगळ्या प्रकारची असल्याने पुर्वानुभवाच्याअधारे या गुन्ह्यात सहभागी गुन्हेगार हे सराईत मध्यप्रदेश राज्यातील असल्याचा कयास पोलिसांनी लावला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंद वाघ, सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, येवाजी महाले, विशाल काठे यांच्या पथकाने अत्यंत तोकड्या माहितीवरुन मध्यप्रदेशमधील इंदुर गाठले. इंदुरसह विविध शहरांमध्ये गोपनीयरित्या माहिती घेत तीन दिवस पथकाने ठिकठिकाणी सापळेही रचले मात्र गुन्हेगार पथकाच्या हाती लागत नव्हते. मिळालेल्या एका सुगाव्यावरुन पोलिसांनी संशयास्पद कारवर पाळत ठेवली आणि एका ढाब्याच्या आवारात सापळा लावला. राखाडी रंगाची मारुती स्विफ्ट कारमधून (एम.पी०४ टीसी १३३२) संशयित गुन्हेगार ढाब्यावर आले असता साध्या वेशातील पथकाने सिनेस्टाइल त्यांना ताब्यात घेतले. अजयसिंग कप्तानसिंग सिसोदिया (२५), बादल कृष्णा सिसोदिया (१९), पर्वतसिंग मिस्त्रीलाल सिसोदिया (४५,रा.तिघे गुलखेडी, पिपलीयारसोडा, जि.राजगड, मध्यप्रदेश) अशी तीघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी या तीघांकडून गुन्ह्यात वापरलेली कार व तीन मोबाइल जप्त केले आहेत. या तीघांना गंगापुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.५) पोलीस कोठडी सुनावली.

मोठ्या शहरांमधील लग्नसोहळ्यात हातसफाई
मध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती. या टोळीचे नेटवर्क मोठे असून या टोळीने आतापर्यंत नाशिकसह पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, संगमनेर तसेच गुजरातमधील सुरत, वापी, अहमदाबाद, तलासुरी, नवसारी आदी शहरांमध्ये अशाचप्रकारे दागिने व रोकडवर डल्ला मारल्याचे तपासात पुढे आले आहे.

---

Web Title: Interstate gangs in custody: used to flee as brides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.