नाशिक : महिलांची गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया उत्तर प्रदेशातील पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने आग्रा येथून अटक केली आहे़ या संशयितांनी शहरात सात गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून सोन्याची लगडीसह सुमारे साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़ त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़
उत्तर प्रदेश येथील टोळी शहरात सोनसाखळी चोरी करीत असून, ती सध्या मूळ गावी गेली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक आनंदा वाघ व सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळाली होती़ त्यानुसार कुलकर्णी, पोलीस हवालदार रवींद्र बागुल, जिवाजी महाले, प्रवीण कोकाटे, पोलीस शिपाई विशाल देवरे, दीपक जठार हे संशयितांच्या शोधासाठी उत्तर प्रदेशला गेले होते़ या ठिकाणी तीन दिवस कसून तपास करून त्यांनी संशयित सोहेल युसूफ खान (२२, खळवाडी, सेंदवा, मध्य प्रदेश), गुलामअली सबदर अली (४८, रा़ संजयनगर कॉलनी, भोपाळ), जुबेर सिराज अली (वय ३०, रा़ देवराज कॉलनी, सेंदवा, मध्य प्रदेश, मूळ रा़ परळी वैजनाथ, जि़ बिड), जाफर इज्जत हुसेन (३४, रा़ परळी वैजनाथ, जि़ बिड) व साहील जावेद जाफरी (वय २४, रा़ रा़ देवराज कॉलनी, सेंदवा, मध्य प्रदेश) यांना अटक केली़
गुन्हे शाखेच्या या पथकाने या पाचही संशयितांना नाशिकमध्ये आणून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पंचवटी व मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी तीन व म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एक सोनसाखळी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली़ त्यांच्याकडून १४० ग्रॅम सोन्याची लगड, महिंद्र लोगन कार, पाच मोबाइल फोन असा नऊ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़
सोनसाखळी चोरीसाठी कार व दुचाकीचा वापरशहरात सोनसाखळी चोरी करण्यासाठी येताना संशयित कार व दुचाकीचा वापर करीत असत़ संशयितांपैकी काही जण कारने तर काही दुचाकीने येत़ कार शहराबाहेर उभी करून दोघे जण शहरात दुचाकीने येत व चेनस्नॅचिंग केल्यानंतर कारमध्ये बसून पळून जात, तर कारमधील दुचाकीने निघून जात असत यामुळे आरोपीचे वर्णन एकमेकांशी जुळत नसे़