नाशिक : प्रत्येक साहित्य संमेलनात होणाऱ्या एका ज्येष्ठ साहित्यिकाच्या मुलाखतीच्या प्रथेनुसार यंदा प्रख्यात प्रकाशक आणि लेखक रामदास भटकळ यांची मुलाखत रंगणार आहे. त्यासाठीचे अधिकृत निमंत्रण भटकळ यांना स्वागताध्यक्षांकडून देण्यात आले असल्याचे समजते.
साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांच्या भाषणाइतकीच उत्सुकता त्या संमेलनात होणाऱ्या ज्येष्ठ लेखकाच्या मुलाखतीचीदेखील असते. त्यात यंदा रंगणारी मुलाखत ही पॉप्युलर प्रकाशनचे प्रमुख रामदास भटकळ यांची होणार आहे. भटकळ हे प्रकाशक म्हणून अधिक प्रख्यात असले तरी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित त्यांनी लिहलेली मोहनमाया आणि जगदंबा या कादंबऱ्या गाजल्या होत्या. त्याशिवाय जिगसॉ, जिव्हाळा, रिंगणाबाहेर ही पुस्तकेदेखील गाजली होती. भटकळ यांनी परंपरागत पुस्तक विक्रीच्या व्यवसायाबरोबरच तरुणपणी गायनाच्या क्षेत्रातही स्वत:ला आजमावून पाहिले होते. ऐन उमेदीच्या काळात त्यांनी शंभरहून अधिक कार्यक्रमांमधून गायन केले होते. रागदारी संगीताच्या मैफली गाजवत बुवा, पंडित या उपाध्यादेखील मिरवल्या होत्या. त्यासाठी भटकळांनी पंडित एस.सी.आर. भट यांच्याकडे त्यांनी काही वर्षं शास्त्रीय संगीताची तालीम घेतली तर संगीतकार यशवंत देव यांच्याकडे ते भावगीतेही शिकले होते, पण पुढे प्रकाशन व्यवसायाचा व्याप वाढल्यामुळे रामदास भटकळांना गाण्याकडे फारसे लक्ष देता आले नव्हते. १९८६ साली ते प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम केले. उत्तर आयुष्यात त्यांनी लेखनाला पुरेसा वेळ देण्यास प्राधान्य दिले. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या संमेलनात त्यांची मुलाखत रंगणार आहे. दिलीप माजगावकर आणि चंद्रकांत पाटील हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.
इन्फो
२००५ साली रंगली पाडगावकरांची मुलाखत
नाशिकला २००५ या वर्षी झालेल्या साहित्य संमेलनात प्रख्यात कवी मंगेश पाडगावकर यांची मुलाखत रंगली होती. अत्यंत रसिक कवी आणि जिंदादिल व्यक्तिमत्त्व असलेल्या पाडगावकर यांची खुमासदार मुलाखत त्या संमेलनाचे विशेष आकर्षण ठरली होती. त्यामुळेच उद्घाटनाच्या सोहळ्याइतकीच गर्दी या मुलाखतीच्या कार्यक्रमालादेखील झाली होती.
फोटो
१९रामदास भटकळ