नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन पहिल्या टप्प्यातील अकरा उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या उमेदवारांच्या मुलाखती ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, अंतिम अकरा नावांची अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी अनेक उमेदवारांनी आपण अंतिम अकरामध्ये असल्याचा दावा केला आहे. कुलगुरूपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी गेल्या ८ जानेवारी रोजी झाल्यानंतर मंगळवार, दि. १२ रोजी पात्र अकरा उमेदवारांची नावे संबंधितांना कळविण्यात आली आहेत. पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारा अंतिम अकरामध्ये निवड झाल्याचे कळविण्यात आले असून, ६ फेब्रुवारी रोजी मुलाखतीची वेळ देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक उमेदवाराला किमान अर्धा तासाचा वेळ दिला जाणार असून, त्यामध्ये त्याचे संगणकीय ज्ञान, वैयक्तिक कामगिरी आणि विद्यापीठाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन अशा तीन विषयांवर मुलाखत होणार असल्याचे समजते. कुलगुरूपदासाठी खुल्या पद्धतीने अर्ज मागविण्यात आल्यानंतर निवडप्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. अत्यंत खुल्या पद्धतीने कुलगुरू निवडप्रक्रिया राबविण्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात याबाबतची कोणतीही माहिती कुलगुरू निवड समितीकडून जाहीर केली जात नसल्यामुळे अनेकांनी आपण अंतिम अकरामध्ये असल्याचा दावा केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भातील शहानिशा करण्यासाठी कुलगुरू शोध समितीचे समन्वयक स्वर्णजित सैनी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते यासंदर्भातील कोणतीही माहिती देत नसल्यामुळे संभ्रमात अधिक भर पडत आहे.
पात्र उमेदवारांच्या ६ फेब्रुवारीला मुलाखती
By admin | Published: January 14, 2016 12:21 AM