पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००५ पासून जिल्ह्यात अवेळी पाऊस येण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात दुष्काळही पडला, यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इच्छा असूनही शेतकऱ्यांना बॅंकांचे कर्ज फेडता आलेले नाही. गेल्या काही वर्षांपासून विविध सहकारी, खासगी आणि सरकारी बॅंकांमार्फत शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात दावे दाखल केले जात आहेत. यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. एका सरकारी बॅंकेने शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्जफेड योजना आणली असून, शेतकऱ्यांनी कर्जफेड केल्यानंतर तीच बँक पुन्हा शेतकऱ्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे कर्जही देत आहे. मात्र जिल्हा सहकारी बँक आणि इतर सरकारी बॅंकांकडे अशी योजना नाही. अनेक शेतकरी एकरकमी कर्जफेड करतात; मात्र त्यांच्या सिव्हिल रिपोर्टमध्ये ते पूर्वी थकबाकीदार असल्याचा उल्लेख होत असल्याने एकरकमी कर्जफेड करूनही शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा भांडवल उपलब्ध होत नसल्याने असे शेतकरी खासगी सावकारांकडे जातात आणि पुन्हा त्यांच्यावर कर्जाचा बोजा चढतो. याशिवाय सर्व बॅंकांचे एकरकमी तडजोडीचे प्रस्ताव सारखे नसल्यानेही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सर्व बॅंकांनी एकरकमी तडजोड योजना सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अर्जुन बोराडे, संतू पाटील झांबरे, बापूराव पगारे, भीमराव बारांडे, भाऊसाहेब भंडारे, सुकदेव पागेरे, दगू गवारे आदींच्या सह्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी एकरकमी तडजोड कर्जफेड योजना आणावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 5:36 AM