नाशिक : लॉकडाऊनमध्ये सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत आता गहूदेखील मिळणार असून, जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी गहू आणि तांदूळ पुरेसा उपलब्ध झाल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. मात्र रेशनच्या अनेक योजना सुरू असल्याने ग्राहकांना रेशनधान्याची माहिती मिळण्यात गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारीतही वाढ झालेली आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुमारे ३५ लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना यापूर्वी प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ वाटप करण्यात आलेला आहे. आता या योजनेतून गहूदेखील वितरित केला जाणार आहे. ग्राहकांना आता प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. जिल्ह्यासाठी या योजनेनुसार अन्नधान्य वाटपासाठी १८०० मेट्रिक टन गहू व तांदळाची गरज असून, जुलै महिन्याचा स्टॉक उचलण्याचे काम रेशन दुकानदारांकडून सुरू करण्यात आला आहे.करोना संकटात लॉकडाऊनमुळे गरिबांची उपासमार होऊ नये यासाठी या योजनेतील लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून प्रति लाभार्थी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहे. १५ जुलैपर्यंत राज्यात एकूण १८ लाख ९९ हजार ३३० रेशनकार्डधारकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले असल्याचे पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी सांगितले.या योजनेतील लाभर्थ्यांसाठी महिन्याला गहू ११०० क्विंटल, तर ७०० क्विंटल तांदळाच्या स्टॉकची गरज आहे. जुलै महिन्याच्या एकूण धान्य साठ्यापैकी ६० टक्के अन्नधान्य उचलून त्याचे रेशन दुकानदारांनी वाटप केले आहे, तर उर्वरित साठा उचलण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने येत्या ७ आॅगस्टपर्यंतची रेशन दुकानदारांना मुदतवाढ दिली असल्याचे सांगण्यात आले.डाळ मिळत नसल्याची तक्रारया योजनेंतर्गत एक किलो डाळदेखील दिली जाते. मात्र अनेक ग्राहकांकडून डाळ मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. नेमकी कोणती डाळ मिळणार, डाळ आली आहे किंवा नाही याबाबत ग्राहकांचा गोंधळ उडविणारी माहिती दिली जात आहे. पुरवठा विभागालादेखील डाळीबाबतची पुरेशी माहिती सांगता आलेली नाही.