सिन्नर : शहरालगत असणाऱ्या शासकीय आयटीआयच्या पाठीमागे असलेल्या जुन्या पाझर तलावातील गाळ काढण्यास दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. मुद्रांक विक्रेता संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब देशपांडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.तत्कालीन आमदार सूर्यभान गडाख यांच्या कार्यकाळात काजी खोºयाच्या परिसरात या पाझर तलावाचे काम झाले होते. हा पाझर तलाव परिसरातील शेतीसाठी वरदान ठरला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या तलावाला गळती लागल्याने दोन-तीन महिन्यातच तलाव कोरडा ठाक पडत होता. तलावात गाळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाणीसाठाही कमी झाला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी देशपांडे यांची भेट घेवून गाळ काढण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांना आवाहन केले होते. जेसीबीने गाळ काहून दिल्यास आपापल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ शेतात नेवून टाकण्याची हमी या शेतकºयांनी घेतली. त्यामुळे देशपांडे यांनी एक जेसीबी गाळ काढण्यासाठी दिला असून प्रत्यक्ष गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. ऋतुराज देशपांडे, संतोष लांडगे, सोमनाथ शिंदे, बाळू बोजेकर यांच्यासह अनेक शेतकºयांनी ट्रॅक्टरने गाळ वाहून नेत आहेत. या मोहिमेमुळे या तालावाची साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून पाण्याची टंचाई कमी होण्यासही हातभार लागणार आहे.
आयटीआय जवळील पाझर तलावाचा गाळ उपसा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 5:41 PM