जनतेच्या न्यायिक मागण्यांसाठी करण्यात आलेल्या विविध आंदोलनादरम्यान किरकोळ स्वरूपाचे गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याविरुध्द दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची मंगळवारी (दि.८) त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. सामाजिक व राजकीय स्वरूपाचे किरकोळ गुन्हे दाखल असलेल्या नागरिकांना पोलीस आयुक्तालयातर्फे सातत्याने नोटिसा बजाविल्या जात असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोरोनाच्या काळात हाताला काम नसल्याने कुटुंबावरील मानसिक ताण वाढत आहे, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी निदर्शनास आणून दिले. शिष्टमंडळात माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, राजेंद्र देसाई आदींचा समावेश होता.
---इन्फो--
‘खाकी’कडून मिळणार एक संधी
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ज्या लोकांना नोटिसा बजावल्या आहेत त्यांना आपली वागणूक सुधारण्याची पोलीस प्रशासनाकडून एक संधी नक्कीच दिली जाईल. त्यासाठी अशा लोकांचे विभागनिहाय मेळावे घेतले जातील आणि त्या भागातील नागरिकांची मतेही जाणून घेण्यात येतील. त्यांचे उपजीविकेचे साधन काय, ते काय काम करतात याचीही पोलिसांकडून माहिती घेतली जाणार आहे. नागरिकांकडून जर त्याबाबत सकारात्मक अभिप्राय आल्यास अशा लोकांना सुधारण्याची एक संधी निश्चितच दिली जाईल, असेही पाण्डेय यावेळी म्हणाले.