वणी : लोकप्रतिनिधीच्या नावाचा बनावट राजमुद्रित लोगो केलेल्या ठिकाणाचा शोध तपास यंत्रणेने लावला असून नाशिकच्या रेडीअमचा व्यवसाय करणाऱ्या व या प्रकरणाबाबत अज्ञात असलेल्या व्यावसायिकास पोलिसांनी तोतयागिरी करणाऱ्या राहुल आहेर याच्या गुन्ह्यात साक्षीदार बनवले आहे.
राजमुद्रित लोगो वाहनावर लावून आमदाराच्या अविर्भावात वावरणाऱ्या राहुल आहेर याची इनोव्हा कार ताब्यात घेतल्यानंतर घटनाक्रमाची मालिकाच पोलिसांसमोर उभी राहिली आहे.
त्या संशयास्पद इनोव्हा कारमधून एका शिक्षण संस्थेला अनुदान देण्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष यांचे नोटपॅड व माजी आमदाराचे ओळखपत्र आढळून आल्यानंतर या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू असताना थेट मंत्रालयात वजन असल्याचे भासवत काहींना गळाला लावले व त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारदारांना साक्षीदार करण्यात आले.
तद्नंतर नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात राहुल आहेर व एका युवतीविरोधात तक्रार दिलेल्या युवतीने वणी पोलीस ठाण्यात येऊन आपबिती कथन केल्याची माहिती मिळाली, मात्र सदर प्रकरण फसवणूक व बनावटीकरण याचे असल्याने पोलिसांनी त्या युवतीचा जबाब पुराव्यादाखल घेतला, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यानच्या कालावधीत राहुल आहेर याचे बँक खाते तसेच त्यातील आर्थिक उलाढाल व अर्थस्रोत याबाबत बारकाईने पोलिसांनी केलेल्या तपासातून बाहेर आलेल्या माहितीमुळे राहुलच्या पोलीस कोठडीत वाढ होत असल्याची वदंता आहे.
दरम्यान, राजमुद्रित लोगो, स्टीकर, लोगो तयार करणाऱ्याची माहिती संकलित करताना त्या व्यावसायिकास अंधारात ठेवून दिशाभूल करून असत्य माहिती सत्य असल्याचे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्या व्यावसायिकाकडून सदर कागदपत्रे तयार करून घेतल्याची बाब पुढे आल्याने त्या व्यावसायिकास या प्रकरणाचा साक्षीदार करण्यात आले आहे.
हायप्रोफाइल प्रकरण असल्याने प्राप्त माहिती पुराव्याशी जोडत सखोल व योग्य दिशेने सुरू असलेल्या वणी पोलिसांचा तपास मार्गक्रमण करत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी अग्रक्रम दिला आहे.
राहुल आहेर याच्या बँक खात्याच्या तपशिलाअन्वये किरकोळ रकमांची उलाढाल दिसत असली तरी मोठ्या रकमांचा तपशील संकलित करताना या रकमा कोणाकडून कशासाठी घेतल्या याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, काहींनी उधारीवर या रकमा दिल्याची प्राप्त माहिती यंत्रणेला असली तरी याबाबत संलग्न चौकशी सुरू आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करणारे कमी नाहीत, असे अनेक तथाकथित आहेत. त्यात राहुल आहेरच्या निमित्ताने हे प्रकरण उघड झाले एवढेच.
या प्रकरणाचा छडा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी लावल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड स.पो.नि. स्वप्निल राजपुत, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे यांनी या प्रकरणाचा केलेला तपास हा स्थानिक गुन्हे शाखेइतकाच महत्त्वाचा आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश वराडे यांनी राहुल आहेर याच्या विरोधात राजमुद्रित लोगो वापराची फिर्याद दिल्यानंतर पुढे आलेला तपासाचा घटनाक्रम वणी पोलिसांचे मनोबल उंचावणारा आहे.