देवळा : येथे रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची आरोग्य विभाग व पोलिसांतर्फे स्वॅब तपासणीची संयुक्त मोहीम राबविली. यावेळी ४५ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून, तिचा अहवाल सोमवारी प्राप्त होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून, त्यामुळे काळजीचे वातावरण आहे. आरोग्य विभाग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारीत आहे; परंतु नागरिक मात्र कोरोनाबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे.
येथे रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात पंचक्रोशीतील नागरिक येतात. यामुळे बाजारात गर्दी होते; परंतु अनेक नागरिक विनामास्क फिरत असतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा हा बेजबाबदारपणा धोकादायक आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व देवळा पोलिसांनी नागरिकांना शिस्त लागावी यासाठी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्या स्वॅब तपासणीची संयुक्त मोहीम राबविली. शहरातील पाच कंदील परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना थांबवून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली बुवा, आरोग्य सहायक सोनजे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जाधव, तालुका समन्वयक अमित आहेर, आरोग्य सेवक झोडगे, डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रशांत कापडणीस, संगीता गायकवाड आदी उपस्थित होते.