नाशिक : कागदोपत्री मतदान केंद्रनिहाय बीएलओंची नेमणूक दाखवून त्यांच्या मानधन रकमेच्या घोटाळ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली असून, त्याची सुरुवात मालेगाव तालुक्यातून करण्यात येणार आहे. येत्या महिन्यात यासंदर्भात अंतर्गत लेखापरीक्षकांमार्फत ही चौकशी पूर्ण करण्यात येईल व त्यानंतर सर्वच विधानसभा मतदारसंघांतील बीएलओंच्या मानधनाच्या रकमेची पडताळणी होणार आहे. यासंदर्भात सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो गोळा करणे व ज्या मतदारांचे कृष्णधवल छायाचित्र आहे त्यांच्याकडून रंगीत फोटो गोळा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्याची जबाबदारी मतदान केंद्रनिहाय नेमलेल्या बीएलओंवर सोपविण्यात आली होती. नाशिक जिल्ह्णातील एक लाख १० हजांराहून अधिक मतदारांची छायाचित्रे गोळा करण्याचे काम एक महिन्यात पूर्ण करावयाचे असताना, प्रत्यक्षात फक्त १३ टक्केच काम होऊ शकले. यात जिल्ह्णातील मालेगाव मध्य व बाह्य मतदारसंघातील बीएलओंनी शून्य टक्के काम केल्याचे उघड झाल्यावर अधिक चौकशीअंती हा घोटाळा उघडकीस आला होता. गेल्या दोन वर्षांपासून बीएलओंना दरवर्षी मानधनाची रक्कम त्यांच्या खात्यावर अदा केली जात असताना, मग निवडणूक आयोगाचे कामकाज का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मालेगावच्या एका निवडणूक कर्मचाºयाने आपल्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणींना कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधनाची रक्कम लाटल्याची बाबही समोर आली.घोटाळ्याची दखल घेत, आता बीएलओंच्या मानधनाच्या रकमेचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकायांनी या संदर्भातील आदेश पारित केले असून, त्रिसदस्यीय समितीमार्फत या चौकशीची सुरुवात मालेगाव तालुक्यापासून करण्यात येणार आहे. एका महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बीएलओं मानधन रकमेच्या घोटाळ्याची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:59 AM