मागील आठवड्यात इगतपुरीमधील बंगल्यांमध्ये रंगलेली हवाईयन रेव्ह पार्टी ग्रामीण पोलिसांनी उधळून लावली होती. या पार्टीतील एकूण २२ संशयितांना पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले होते. यामध्ये ‘बिग बॉस मराठी सिझन-२’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री हिना पांचालसह बॉलिवूडशी संबंधित कोरिओग्राफर, कॅमेरामन यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने या हायप्रोफाइल रेव्ह पार्टीची चर्चा राज्यभरात रंगली होती. या पार्टीत केवळ हुक्का, मद्यप्राशनच नव्हे तर चरस, कोकेनसारखे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात सेवन केले गेल्याचे पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून समोर आल्याने या पार्टीच्या तपास वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचला. पोलिसांनी २८ संशयितांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वयेे गुन्हा दाखल केला तसेच २५ संशयितांना न्यायालयापुढे हजर करत सतत पोलीस कोठडी मिळवून रेव्ह पार्टीमध्ये आलेल्या ड्रग्जचे कनेक्शन शाेधत काशिमिरा येथून ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या नायजेरियन युवकालाही बेड्या ठोकल्याने या रेव्हपार्टीचे प्रकरण अधिकच गंभीर असल्याचे दिसून आले. आठवडाभर तालुका न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. येथील विशेष न्यायालयाने बुधवारी हिनासह २५ संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
--इन्फो---
‘त्या’ दोघांचा शोध सुरुच
बर्थ-डे पार्टीसाठी ड्रग्ज पुरविणाऱ्या त्या दोघा फरार संशयित आरोपींचा शोध सुरूच आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने राजस्थानपर्यंत यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र अद्याप पथकाला यश आलेले नाही. यामुळे नायजेरियन पीटर उमाहीचे ‘नेटवर्क’ पोलिसांकडून तपासले जात आहे. दरम्यान, पार्टीसाठी चरस, कोकेनसारखे अंमली पदार्थ जास्त प्रमाणात पुरविले गेलेले होते आणि दोन दिवस हे २२ तरुण, तरुणींकडून सर्रासपणे त्याचे सेवन केले जात होते, असेही साक्षीदारांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे.
----इन्फो----
रक्त, लघवी आणि स्वीमिग टॅँकच्या पाण्याचे नमुन्यांच्या तपासणी अहवाल अद्यापही प्रलंबितच आहे. २२ संशयितांच्या रक्त, लघवीच्या नमुने पोलिसांनी तपासणीकरिता प्रयोगशाळेला पाठविले आहेत तसेच संशयितांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज स्वीमिँग टँकमध्ये फेकले गेल्याचे काही साक्षीदारांनी पोलिसांना सांगितले तसेच अंमली पदार्थ शोधक श्वानानेही स्वीमिंग टॅँकच्या दिशेने संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी येथील पाण्याचे नमुनेही संकलित करून ते देखील तपासणीसाठी पाठविले आहेत.