नाशिक : महापालिकेत गाजत असलेल्या नाशिकराड येथील शंभर कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी अखेरीस सुरू झाली आहे.
अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडेंच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अखेरीस सुरुवात केली असून, नगररचना विभागाकडे या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी पत्र पाठवले आहेत. नाशिक महापालिकेत गाजत असलेल्या या घोटाळ्याची चौकशी वेगवेगळ्या स्तरावर करण्यात येेत आहे. आधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली होती. त्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. देवळाली शिवारातील सर्व्हे क्र. २९५/१ या भूखंडासंदर्भातील घोटाळ्यासंदर्भातील चौकशी सुरू होत नाही तोच संबंधित कागदपत्रे दोन वेळा गायब होण्याचे प्रकार घडले आहेत. या घोटाळ्यासंदर्भात अगाेदर प्रशासन उपआयुक्तांनी चौकशी केली आहे. त्यांनी अंतिम अहवाल दिल्यानंतर नगरविकास खात्याने चौकशीचे आदेश दिल्याने आता अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येत आहे. मात्र, पूर्वीच्या म्हणजेच प्रशासन उपआयुक्तांनी केलेल्या चौकशीचा अहवाल अंतिम करायचा की नव्याने चौकशी करायची, असा प्रश्न अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने उपस्थित केला होता. आयुक्तांनी यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले नसल्याचेदेखील समितीचे म्हणणे होते. मात्र, आता आयुक्तांनी सुस्पष्ट आदेश दिल्याने चौकशी सुरू झाली आहे.
इन्फो..
या घोटाळ्यातील पत्रव्यवहार विशेषत: जागा मालकाला दिलेली नोटीस गायब झाल्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू झाली असली तरी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी नगररचना विभागाकडून या भूखंडाशी संबंधित जे जे व्यवहार झाले आहेत, ती सर्व कागदपत्रे मागवली आहेत. येत्या तीन-चार दिवसांत समितीची बैठक होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.