नाशिक : पुण्यातील युनिव्हर्सल बायो आॅरगॅनिक अॅण्ड मल्टी सर्व्हिस कंपनीत गुंतवणूक केलेल्या सिडकोतील गुंतवणूकदार युवकाची कंपनीने परतावा न देता सात लाखांची फसवणूक केल्याची घडना घडली आहे़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य सोनवणे (२६, रा़ अश्विनी मेडिकलजवळ, सिडको) यांनी ८ फेब्रुवारी २०१५ ते १६ डिसेंबर २०१५ या कालावधीत पुण्यातील युनिव्हर्सल बायो आॅरगॅनिक अॅण्ड मल्टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (निहारिका निवास, निर्मल टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर, पुणे) या कंपनीचे संचालक संशयित गोविंद केशवराव डाके (४७, रा़ पुणे), विकास सांगळे (४२, रा़ सूर्यनारायण चौक, रायगडनगर, पवननगर, सिडको) यांच्या सांगण्यावरून सात लाख रुपयांची गुंतवणूक केली़ मात्र गुंतवणुकीचा कोणताही परतावा दिला जात नसल्याने सोनवणे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता़ या दाव्यामध्ये अंबड पोलिसांना न्यायालयाने कंपनी संचालका ंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बायो आॅरगॅनिक कंपनीकडून गुंतवणूकदाराची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:26 AM