घोटी : ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या धोरणानुसार महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करण्यात आल्यानंतर या रस्त्याची देखभाली-बरोबर पथकर वसुलीची जबाबदारी असलेल्या संबंधित कंपनीने केवळ टोल वसुलीकडे विशेष लक्ष केंद्रित करून रस्त्याच्या दुरुस्तीकडे व वाहनधारकांच्या सोयी सुविधांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने कसारा घाट ते गोंद्यापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, या खड्ड्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाळा संपून महिना उलटूनही टोल वसूल करणाऱ्या कंपनीने अद्यापही या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत संबंधित कंपनीने लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करावी व वाहनधारकास आवश्यक त्या सुविधा द्याव्यात अशी मागणी होत आहे.मुंबई-आग्रा महामार्गाचे वडपे ते गोंदे असे ९० किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर घोटी येथे टोल वसुली करण्यात येत आहे. वाहनधारक व वाहनचालक यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्यावर टोल वसूल करणाऱ्या कंपनीकडून कोणत्याही सोयी सुविधा न देता दरवर्षी या टोल नाक्यावरून जाचक टोल दरवाढ करण्यात येत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर टोल वसुलीबरोबर या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यात रस्त्याची वेळोवेळी दुरुस्ती करणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत पुरविणे, रस्त्यावर जागोजागी रिप्लेक्टर लावणे, दिशादर्शक फलक व सूचना फलक लावणे, रस्त्याची स्वच्छता ठेवणे, वैद्यकीय सुविधा व अग्निशामक यंत्रणा कायमस्वरूपी तैनात ठेवणे, अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी यासाठी २४ तास कार्यान्वित असलेला टोल फ्री नंबर उपलब्ध करून देणे, अपघातानंतर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी मोठ्या क्षमतेची क्रेन तैनात ठेवणे, या रस्त्याची कायम पेट्रोलिंग करणे व आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याचे साइड गार्ड व संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे याबरोबर महामार्गालगत गावात जाणाऱ्या रस्त्याच्या चौफुलीवर व ट्रक टर्मिनस या ठिकाणी जास्त प्रकाशाचे हायमास्ट लावणे अशा सुविधा देण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाने टोल वसूल करणाऱ्या कंपनीवर टाकली असताना टोल वसूल करणारी कंपनी या बाबीकडे काणाडोळा करीत असून, वसुलीतच धन्यता मानत आहेत. (वार्ताहर)
अपघाताला निमंत्रण : महामार्गाच्या देखभाल दुरूस्तीकडे कंपनीचे दुर्लक्ष
By admin | Published: December 03, 2014 11:18 PM